गोवंडी, अंधेरी-जोगेश्वरीतून घातक शस्त्रांसह तिघांना अटक
ओशिवरा, गोवंडी आणि आंबोली पोलिसांची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – गोवंडी, अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात घातक शस्त्रांसह तीन तरुणांना ओशिवरा, गोवंडी व आंबोली पोलिसांनी अटक केली. अंकुश लहू सातपुते, मोहम्मद कमर रौफ खान आणि रामजाने रमेश कांबळे अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक विदेशी बनावटीचे पिस्तूल, एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक गावठी कट्टा, आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी रात्री उशिरा ओशिवरा पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. ही गस्त सुरु असताना जोगेश्वरी परिसरात काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दिपक बर्वे, पोलीस हवालदार शैलेश शिंदे, मुजावर, बोबडे यांनी जोगेश्वरीतील न्यू लिंक रोड, आनंदनगर, आदर्शनगर सिग्नलजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री उशिरा तिथे एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत होता. त्यामुळे त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव रामजाने कांबळे असून अंधेरीतील वर्सोवा-यारी रोड परिसरात राहत असल्याचे उघडकीस आले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस सापडले. या गावठी कट्ट्याबाबत विचारणा केल्यानंतर तो कट्टा विक्रीसाठी तिथे आला होता असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गावठी कट्टा आणि काडतुस जप्त केले.
दुसर्या कारवाईत अंकुश सातपुते याला आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस सापडले. अंकुश हा पिस्तूल घेऊन अंधेरीतील न्यू लिंक रोड, आरटीओ मैदानाजवळ आला होता, ही माहिती प्राप्त होताच पोलिसांनी त्याला अटक केली. तिसर्या कारवाईत गोवंडी पोलिसांनी मोहम्मद कमर याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. गोवंडीतील सायन-पनवेल रोड, टेलिकॉम फॅक्टरीजवळ मोहम्मद कमर हा घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाटील, पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव गाडे, पोलीस हवालदार विजय चव्हाण, देसाई, हंबीर, बागवान, पोलीस शिपाई माने यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून त्याला अटक केली.
मोहम्मद कमर हा गोवंडीतील बैॅगनवाडी, रामनगरचा रहिवाशी असून सध्या काहीच कामधंदा करत नाही. घातक शस्त्रे बाळगणे, त्याची विक्री करण्याचा प्रयत्न करणे आदी कलमांतर्गत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. त्यांना ते शस्त्रे कोणी दिले, ते शस्त्रे कोणाला देणार होते, त्यांनी यापूर्वीही घातक शस्त्रांची विक्री केली आहे का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.