आरोमा लक्झरी स्पामध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
मॅनेजरसह दोघांना अटक तर सात तरुणींसह महिलांची सुटका
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 डिसेंबर 2025
मुंबई, – गोरेगाव परिसरात असलेल्या आरोमा लक्झरी या स्पामध्ये मसाजच्या नावाखाली चालणार्या सेक्स रॅकेटचा गोरेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी स्पाच्या मॅनेजरसह दोघांना पोलिसांनी अटक केली तर या कारवाईत सात तरुणीसह महिलांची सुटका केली. मेडीकलनंतर सर्वांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. अटक आरोपीमध्ये श्रवण संतोष दुबे आणि दिलीप संजीव यादव यांचा समावेश असून यातील श्रवण हा स्पाचा मॅनेजर तर दिलीप हा त्याचा मदतनीस म्हणून काम करत होता. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोरेगाव येथील एम. जी रोड, एकविरा प्रसाद इमारतीमध्ये आरोमा लक्झरी नावाचे स्पा आहे. या स्पामध्ये मसाजच्या नावाखाली तिथे कामाला असलेल्या तरुणींच्या मदतीने स्पाचा मॅनेजर सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने त्याची शहानिशा केली होती. ठरल्याप्रमाणे तिथे एका बोगस ग्राहकाला पाठविण्यात आले होते. या ग्राहकाने स्पाचा मॅनेजर श्रवण दुबे याच्याकडे मसाजसह स्पेशल सर्व्हिसची मागणी केली होती. यावेळी त्याने दिलीपच्या मदतीने त्यांना काही तरुणी दाखवून त्यापैकी एकीची निवड करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी एका महिलेची निवड केली आणि श्रवण दुबेला ठरलेला मोबदला होता.
याच दरम्यान या बोगस ग्राहकाने मिस कॉल देऊन बाहेर साध्या वेशात पाळत ठेवलेल्या पोलीस पथकाला सिग्नल दिला होता. या कॉलनंतर पोलीस निरीक्षक मनोज पाटील, उमेश दंडिले, महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा कागलकर, पोलीस शिपाई शेख, महिला पोलीस शिपाई रत्ना पालवी व अन्य पोलीस पथकाने तिथे अचानक छापा टाकला होता. यावेळी आर्थिक व्यवहार सुरु असताना स्पाचा मॅनेजर श्रवण दुबे आणि दिलीप यादव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळी असलेल्या काही तरुणींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कारवाईत पोलिसांनी सात तरुणीसह महिलांची सुटका केली.
त्यांच्या चौकशीतून श्रवण दुबे हा मसाजच्या नावाने तिथे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले. ग्राहकांकडून पैसे घेतल्यांनतर त्यांना त्यांच्यासोबत शारीरिक संबंधासाठी पाठविले जात होते. त्यातील मोठा हिस्स तो घेत होता तर उर्वरित रक्कम बळीत तरुणीसह महिलांना दिला जात होता. तपासात आलेल्या माहितीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. त्यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रवण हा स्पाचा मॅनेजर असून दिलीप त्याला मदतनीस म्हणून काम करत होता. त्याच्यावर स्पामध्ये येणार्या पुरुष ग्राहकांना तरुणी दाखविण्याची जबाबदारी होती. स्पामधून पोलिसांनी सात तरुणीसह महिलांची सुटका करुन त्यांना मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविले होते.