मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 जुलै 2025
मुंबई, – गेल्या आठवड्यात क्षुल्लक वादातून आर्थर रोड जेलमध्ये दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जेल प्रशासनाने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान या हाणामारीनंतर वरिष्ठांच्या आदेशावरुन एन. एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गॅगस्टर प्रसाद पुजारीसह इतर सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून तपास सुरु केला आहे. हाणामारी नक्की कोणत्या कारणावरुन झाली, ही हाणामारी पूर्वनियोजित कटाचा एक भाग होता का याचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
विविध गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या विविध टोळीचे गॅगस्टस्ट, लहानसहान गुन्ह्यांतील आरोपीसह फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांतील आरोपी सध्या आर्थर रोड कारागृहात बंदिस्त आहे. आर्थर रोड जेलमध्ये क्षमतेपेक्षा अधिक आरोपी असल्याने या आरोपींमध्ये नेहमीच क्षुल्लक कारणावरुन खटके उडतात. 7 जुलैला जेलमध्ये दोन गटात क्षुल्लक कारणावरुन अचानक हाणामारी झाली होती. हा प्रकार अधिक चिघडळण्यापूर्वीच जेल प्रशासनाने वेळीच प्रसंगावधान दाखवून त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. सर्वाना बाजूला करुन बॅरेकमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्यामुळे तिथे मोठा अनर्थ टळला होता.
प्राथमिक तपासात प्रसाद पुजारीसह इतर गुंडांकडून हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे जेल प्रशासनाच्या तक्रारीवरुन एन. एम. जोशी पोलिसांनी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यात प्रसाद ऊर्फ सुभाष विठ्ठल पुजारीसह इरफान रहिम खान, शोएब खान ऊर्फ भुरया, अयुब अनुमुद्दीन शेख, मुकेश सिताराम निशाद, लोकेंद्र उदयसिंग रावत, सिद्धेश संतोष भोसले यांचा समावेश आहे.
अचानक दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेने जेलमध्ये इतर आरोपींमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने त्याचा तपास स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून सुरु आहे. दोन गटात कुठल्या कारणावरुन वाद झाला, हा वाद पूर्वनियोजित होता का, हाणामारीत कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र त्यात दुखापती व्हावी असे कोणाला वाटत होते, हाणामारीमागे कोण टार्गेट होते याचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
प्रसाद पुजारी हा अंडरवर्ल्ड गॅगस्टर असून त्याच्याविरुद्ध खंडणीसह अन्य गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या वीस वर्षांपासून तो त्याच्या पत्नीसोबत चीनमध्ये राहत होता. त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केले होते. चीनमध्ये वास्तव्यास माहिती मिळताच त्याच्या अटकेसाठी इंटरपोलची मदत घेण्यात आली होती. अखेर इंटरपोलच्या मदतीने त्याला मार्च 2024 रोजी भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्यानंतर त्याला खंडणीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड जेलमध्ये आहे.