आर्थर रोड कारागृहातील तुरुंग अधिकार्यावर प्राणघातक हल्ला
दोन कैंद्यामधील वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्नात जखमी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 सप्टेंबर 2025
मुंबई, – आर्थर रोड कारागृहातील एका कारागृह अधिकार्यावरच एका कैद्याने शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देत प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. या हल्लत राकेश चव्हाण हे अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या तक्रारीवरुन एन. एम जोशी मार्ग पेालिसांनी अफान सैफीउद्दीन खान नावाच्या आरोपी कैदीविरुद्ध गंभीर दुखापतीसह सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत लोकल कोर्टाच्या परवानगीने अफानला अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन कैद्यामधील वादात राकेश चव्हाण यांनी मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता, त्यातून हा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आला आहे. दरम्यान या घटनेने शनिवारी दुपारी आर्थर रोड कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आणि इतर कैद्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
अफानला एका गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून त्याला आर्थर रोड कारागृहाच्या बॅरेक दोनमध्ये ठेवण्यात आले होते. शनिवारी दुपारी अफानचे इम्तियाज इस्तियाक खान या कैद्याशी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले होते. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या कारागृह अधिकारी राकेश चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तिथे धाव घेऊन त्यांच्या वादात मध्यस्थी करुन दोघांनाही बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा राग आल्याने अफानने राकेश चव्हाण यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती.
या धमकीनंतर त्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हाताने तसेच लाथ्याबुक्यांनी मारहाण करुन तेथील गेटवर त्यांचे डोके जोरात आदळले होते. त्यात राकेश चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली होती. अचानक झालेल्या आरडाओरडानंतर तिथे कारागृहातील इतर अधिकारी आणि कर्मचार्यांनी धाव घेतली होती. यावेळी जखमी झालेल्या राकेश चव्हाण यांना तातडीने तेथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. ही माहिती मिळताच एन. एम जोशी मार्ग पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी राकेश चव्हाण यांच्या जबानीनंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसाीं अफान खान याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत त्याला अटक करुन त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेने तिथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे अफानसह इस्तियाकला त्यांच्या बॅरेकमध्ये हलविण्यात आले होते. दरम्यान या घटनेची वरिष्ठ कारागृह अधिकार्यांनी गंभीर दखल घेत घडलेल्या प्रकाराचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे कारागृहात कैंद्यामध्ये असे हाणामारीचे प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.