डोबिवली येथून घातक शस्त्रांसह दोघांना अटक

चार देशी बनावटीचे पिस्तूल, 35 काडतुसे जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 जून 2025
मुंबई, – डोबिवली परिसरात घातक शस्त्रांसह दोघांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या आरोपीकडून पोलिीसांनी चार देशी बनावटीचे पिस्तूल आणि 35 जिवंत काडतुसांचा साठा जप्त केला आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने यापूर्वीही घातक शस्त्रांची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्याची माहिती काढण्याचा पोलीस प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याची मुंबईसह इतर शहरात मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. त्यामुळे अशा आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना डोबिवली परिसरात एक व्यक्ती राहत असून त्याने इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रे आणली आहेत. या शस्त्रांचा काही गंभीर गुन्ह्यांत वापर असल्याची माहिती राज्य एटीएस पथकाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी महात्मा गांधी रोड परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून या आरोपीस अटक केली होती. त्याच्याकडे पोलिसांना तीन देशी बनावटीचे पिस्तूल आणि 35 जिवंत काडतुसे सापडली होती.

चौकशीत त्याने एक देशी बनावटीचे पिस्तूल त्याच्या परिचित व्यक्तीला विक्री केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी अन्य एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. याच गुन्ह्यांत त्याच्या सहकार्‍याला पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी चार देशी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅगझीन, 35 जिवंत काडतुसे असा सुमारे साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगणे, घातक शस्त्रांची विक्री करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page