मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ डिसेंबर २०२४
मुंबई, – बांगलादेशातील उपासमारीसह बेरोजगारी कंटाळून भारतात आलेल्या आणि नंतर विविध शहरात वास्तव्यास असलेल्या तीन महिलांसह सतरा बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, नाशिक शहरात करण्यात आली. याप्रकणी आतापर्यंत दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील काही बांगलादेशी नागरिकांकडून भारतीय नागरिक असल्याचे बोगस दस्तावेज सापडले असून दस्तावेजाची पोलिसाकडून शहानिशा सुरु आहे, त्यांना ते बोगस दस्तावेज कोणी बनवून दिले याचा शोध सुरु आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबईसह इतर शहरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती एटीएसला मिळाली हाती. या माहितीची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. मुंबईतील सर्व युनिटच्या अधिकार्यांना अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानंतर एटीएसच्या विशेष पथकाने मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि नाशिक शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या सतरा बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्यात तीन महिलांसह चौदा पुरुषांचा समावेश होता. याप्रकरणी आतापर्यंत दहा स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
या बांगलादेशी नागरिकांची चौकशी केल्यानंतर त्यातील काही नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईसह आसपासच्या शहरात वास्तव्यास होते, याच दरम्यान त्यांनी भारतीय नागरिक असल्याचे काही बोगस दस्तावेज बनविले होते. त्यात आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्डसह इतर दस्तावेजचा समावेश आहे. बांगलादेशातील उपासमारीसह बेरोजगारीला कंटाळून ते सर्वजण भारतात आले होते. त्यानंतर ते सर्वजण मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, नाशिक शहरात वास्तव्यास होते. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.