अपघात दाखवून ज्चेलर्स व्यापार्याला जिवे मारण्याचा प्रयत्न
एका हल्लेखोराला अटक तर दोघांचा ताबा गुन्हे शाखेकडे
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ डिसेंबर २०२४
मुंबई, – अपघात दाखवून एका ज्वेलर्स व्यापार्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एक महिन्यानंतर एल. टी मार्ग पोलिसांनी अपघाताच्या कलमांमध्ये बदल करुन हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत प्रशांत दिनेश कविता या २४ वर्षांच्या आरोपीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने अटक करुन त्याला पुढील चौकशीसाठी एल. टी मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. या गुन्ह्यांत निरंजन सुदर्शन गुप्ता आणि केतन मनिष पारिख या दोघांना घातक शस्त्रांसह दया नायक यांच्या पथकाने अटक केली असून या दोघांचा लवकरच ताबा एल. टी मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे.
किरणराज मुन्नालालजी शाह हे ६७ वर्षांचे वयोवृद्ध चिराबाजार येथील मुन्ना मेंशन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील ५२२/२४ मध्ये राहतात. ते ज्वेलर्स व्यापारी असून त्यांच्या मालकीचे चिराबाजार परिसरात एक ज्वेलर्स शॉप आहे. १८ नोव्हेंबरला दुपारी पावणेदोन वाजता ते त्यांच्या बाईकवरुन जात होते. यावेळी एका अज्ञात बाईकस्वाराने जाणूनबुजून त्यांच्या बाईकला धडक दिली होती. या अपघातात त्यांची बाईक स्लीप झाली आणि ते जखमी झाले होते. याप्रकरणी एल. टी मार्ग पोलिसांनी अज्ञात बाईकस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने निरंजन गुप्ता आणि केतन पारीख या दोघांना अटक केली होती. या दोघांकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक मॅगझीन आणि नऊ जिवंत काडतुसे जप्त केली होती. ते शस्त्रे पोलिसांनी किरणराज शाह यांच्या ज्वेलर्स शॉपमधून जप्त केले होते.
चौकशीत केतन हा त्यांचा शॉपमधील कर्मचारी असून त्यानेच किरणराज यांना खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्याच्या उद्देशाने त्यांच्या शॉपमध्ये घातक शस्त्रे ठेवली होती. मात्र निरंजन गुप्ताच्या अटकेनंतर या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता. त्यानेच केतनने ते शस्त्रे दिली होती, त्यानंतर त्याने ते शस्त्रे ज्वेलर्स शॉपमध्ये ठेवल्याचे तपासात उघडकीस आले. या दोघांनी प्रशांत कविताच्या मदतीने किरणराज यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. १८ नोव्हेंबरला अपघात दाखवून त्यांनी किरणराज यांच्यावर जिवघेणा हल्ला केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एल. टी मार्ग पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजमध्ये प्रशांतने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे याच गुन्ह्यांत आता हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या प्रशांत कविता याला बोरिवली येथून दया नायक व त्यांच्या पथकाने अटक केली.
प्रशांत हा दहिसर येथील गणेशनगर परिसरात राहत असून तो फेरीवाला म्हणून काम करतो. त्याच्याकडून पोलिसंनी एक मोबाईल आणि गुन्ह्यांतील बाईक जप्त केली आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी एल. टी मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. दुसरीकडे घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी निरंजन गुप्ता आणि केतन पारिख हे दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांच्या कोठडीची मुदत संपताच त्यांचा एल. टी मार्ग पोलिसांकडे ताबा देण्यात येणार आहे. केतननेच निरंजन आणि प्रशांतच्या मदतीने किरणराज यांच्यावर जीवघेणा हल्ल्याची योजना बनविली होती. या तिघांच्या अटकेने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात दया नायक व त्यांच्या पथकाला यश आले आहे.