हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक

मैत्रिणीवरुन झालेल्या वादातून हल्ला झाल्याचे तपासात उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 मार्च 2026
मुंबई, – हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक केली. विकास ऊर्फ विकी राजू निनानिया असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मैत्रिणीवरुन झालेल्या वादातून आरिफ रुकमउद्दीन शेख या 32 वर्षांच्या सुरक्षारक्षकावर नऊजणांच्या एका टोळीने चाकूसह तलवारीने वार तसेच हातासह लाथ्याबुक्यांनी मारहाण करुन गंभीररीत्या जखमी केले होते. या हल्ल्यानंतर विकास ऊर्फ विकी हा पळून गेला होता, अखेर तीन महिन्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

आरिफ शेख हा मूळचा हैद्राबादचा रहिवाशी असून सध्या बोरिवली येथे राहतो. सुपर सिक्युरिटी सर्व्हिस कंपनीत तो सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. त्याचा सनी सालेकर हा मित्र असून तो त्याच्या मैत्रिणीशी बोलत असल्याने त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हापासून त्यांच्यात सतत खटके उडत होते. 6 डिसेंबर 2025 रोजी त्याच्या गावाकडचे काही मित्र त्याला भेटण्यासाठी आले होते. रात्री साडेतीन वाजता ते त्यांच्या कारमधून दहिसर येथील आनंदनगर ब्रिज, दहिसर सबवेच्या दिशेने जात होते. तिथे काही वेळ थांबले असता सनी व त्याचे काही सहाकारी आले होते. त्यापैकी विकीच्या हातात तलवार तर विशाल गोडसेच्या हातात चाकू होता.

आरिफला पाहताच त्यांनी त्याला त्याचा आज गेम करायचा असे सांगून त्याच्यावर चाकूसह तलवारीने वार केले होते. त्याला हातासह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. यावेळी आरिफच्या मित्रांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांना मध्यस्थी केल्यास परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. या हल्ल्यात आरिफ हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर कूपर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिथेच त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले होते.

या घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी आरिफची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर सनी सालेकर, दिपक दुबे, रोमन शेख, शेखर पल्लक, विकी निनानिया, विशाल गोडसे, अरविंद ऊर्फ लाला आणि इतर दोघांविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या घटनेनंतर विकी ऊर्फ विकास हा पळून गेला होता.

त्याचा तीन महिन्यांपासून पोलीस शोध घेत होते, मात्र तो प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात होता. अखेर त्याला दोन दिवसांपूर्वीच दहिसर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मैत्रिणीवरुन झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page