दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून 21 वर्षांच्या तरुणावर हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत दोघांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 ऑगस्ट 2025
मुंबई, – दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून अकबर मुस्तफा लम्बे या 21 वर्षांच्या तरुणावर त्याच्या परिचित तरुणांनी लोखंडी रॉडसह बांबू बेदम मारहाण करुन प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अकबर हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध शिवडी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आसिफ मोहम्मद अकील शेख आणि शकील मोहम्मद रफिक शेख अशी या दोघांची नावे आहेत असून ते दोघेही शिवडीतील रहिवाशी आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता रे रोड येथील एमओडी गेट, पारधीवाडाजवळ घडली. अकबर लम्बे हा तरुण याच परिसरातील दारुखाना, जयभीम नगरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. आसिफ मोहम्मद आणि शकील मोहम्मद हे दोघेही त्याच्या परिचित आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता अकबर हा कामावरुन घरी जात होता. पारधीवाडाजवळ येताच तयाला दोन्ही आरोपी भेटले. या दोघांनी त्याच्याकडे दारुसाठी पैशांची मागणी केली होती. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला होता. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या भरात या दोघांनी त्याला शिवीगाळ करुन बांबूसह लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती.
हा प्रकार त्याचा भाऊ अब्बास लम्बे आणि आत्या नसीमा शेख यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनी त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ल्यानंतर ते दोघेही तेथून पळून गेले. जखमी झालेल्या अकबरला स्थानिक रहिवाशांनी तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर तिथे उपचार सुरु आहेत.
या घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अकबर लम्बे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आसिफ मोहम्मद आणि शकील मोहम्मद यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.