चेंबूर येथे 23 वर्षांच्या तरुणीवर रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून हल्ला

अकरा गुन्ह्यांची नोंद आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 ऑगस्ट 2025
मुंबई, – घरी जाणार्‍या एका 23 वर्षांच्या तरुणीवर तिच्याच परिचित रेकॉर्डवरील गुन्हेगाराने लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. या हल्ल्यात भाग्यश्री नावाच्या तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी सुमीत ऊर्फ पिंट्या संघरक्षक सोरटे या 32 वर्षांच्या आरोपीविरुद्ध चेंबूर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुमीत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अकराहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हल्ल्यानंतर सुमीत पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. या हल्ल्यामागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही.

ही घटना शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता चेंबूर येथील के. एन गायकवाड मार्ग, सिद्धार्थ कॉलनी, भैरव ज्वेलर्स दुकानासमोर घडली. चेंबूर परिसरात भाग्यश्री ही तिच्या कुटुंबियांसोबत राहते. गुरुवारी ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. मैत्रिणीच्या घरातून ती तिच्या जात होती. भैरव ज्वेलर्स दुकानासमोर येताच तिथे सुमीत सोरटे आला. तो याच परिसरात राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. त्याने तिला रस्त्यावर अडविले, त्यानंतर त्यांच्या कुठल्या तरी कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात त्याने तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात भाग्यश्री ही गंभीररीत्या जखमी झाली होती. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास येताच त्यांनी ती माहिती चेंबूर पोलिसांना दिली. या माहितीनंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी जखमी झालेल्या भाग्यश्रीला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीवरुन पोलिसांनी सुमीत सरोटे याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तपासात सुमीत हा चेंबूच्या सिद्धार्थ कॉलनी, चंदू शिंदे प्लॉटमध्ये राहतो. तो मुंबई पोलिसांच्या अभिलेखावरील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध चेंबूर, चुन्नाभट्टी, नेहरुनगर पोलीस ठाण्यात मारामारी, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देणे, अपहरण, लैगिंक अत्याचार, घरफोडी, चोरी, विनयभंग, गंभीर दुखापत करणे अशा अकराहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या जामिनावर बाहेर होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वी पोलिसांनी तीन ते चार वेळेस प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. जून 2025 रोजी त्याच्यावर दोन वर्षांसाठी मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतून तडीपारची कारवाई करण्यात आली होती. तडीपारची ही कारवाई सुरु असताना त्याने धनश्री या तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे.

हल्ल्यानंतर तो पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी चेंबूर पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान या हल्ल्यामागील कारण समजू शकले नाही. जखमी तरुणीवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. तिची लवकरच पोलिसांकडून सविस्तर जबानी नोंद केली जाणार आहे. या जबानीनंतर त्यांच्यात कुठल्या कारणावरुन वाद झाला याचा खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील मोरे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page