बहिणीला छेडतो म्हणून सोळा वर्षांच्या मुलावर चाकूने हल्ला
सोळा वर्षांच्या आरोपी मुलाची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 ऑगस्ट 2025
मुंबई, – बहिणीला छेडतो या संशयावरुन दहावीच्या सोळा वर्षांच्या शाळकरी मुलावर त्याच्याच परिचित सोळा वर्षांच्या मुलाने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात घडली. या हल्ल्यात शाळकरी मुलगा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या सोळा वर्षांच्या आरोपी मुलाला मानखुर्द पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी डोंगरीतील बालसुधारगृहात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजता मानखुर्द येथील पीएमजीपी कॉलनी, म्हाडा इमारत क्रमांक 91 च्या समोरील रस्त्यावर घडली. अजय (नावात बदल) हा मानखुर्दच्या साठेनगर परिसरात राहत असून त्याचे वडिल चालक म्हणून काम करतात. सध्या तो पीएमजीपी कॉलनीतील एका शाळेत दहावीत शिकतो. याच परिसरात आरोपी जावेद (नावात बदल) हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. अजयचे जावेदच्या बहिणीसोबत मैत्री होती. त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधामुळे परिसरात त्यांच्याविषयी प्रचंड चर्चा होती. त्यातच ते दोघेही परिसरात अनेकदा बोलत होते. त्यांच्या बोलण्यावरुन अनेकांना त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे वाटत होते.
हा प्रकार जावेदला समजताच त्याला अजयचा प्रचंड राग होता. गुरुवारी 13 ऑगस्ट 2025 रोजी याच कारणावरुन जावेद आणि अजय यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर त्याच्या कुटुंबियांनी अजयसह त्याच्या आई आणि काकांविरुद्ध मानखुर्द पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर त्यांच्यातील वाद विकोपास गेला होता. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता अजय हा त्याच्या मित्रांसोबत शाळेतून घरी जात होता. यावेळी तिथे जावेद आला आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला होता. याच कारणावरुन त्यांच्यात पुन्हा भांडण झाले होते. या भांडणात रागाच्या भरात जावेदने अजयवर त्याच्याकडील चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. माझ्या बहिणीला छेडतोस काय, आज तुला संपवून टाकतो अशी त्याने धमकी दिली होती.
या हल्ल्यात त्याच्या हाताला, पाठीला आणि मानेला गंभीर दुखापत झाली होती. यावेळी जावेदने शाळेतील इतर मुलांनाही कोणी मध्यस्थी प्रयत्न केला तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे अजयसोबत असलेल्या मित्रांसह इतर शाळेतील मुलांनी तेथून पळ काढला होता. जखमी अवस्थेत अजय हा शाळेत गेला आणि त्याने शाळेतील मुख्याधापकांना घडलेला प्रकार सांगतला. त्यानंतर शाळेच्या मुख्याधापकांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली होती. कंट्रोल रुममधून ही माहिती प्राप्त होताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
जखमी झालेल्या अजयला आधी शताब्दी आणि नंतर राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी जावेदविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तो सोळा वर्षांचा असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.