मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पत्नीशी अश्लील संभाषण करतो, तिच्याकडे वाईट नजरेने पाहतो म्हणून जाब विचारणार्या तरुणानेच मुरगन अंगमुत्तू देवेंद्र याच्यावर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना अॅण्टॉप हिल परिसरात घडली. या हल्ल्यात मुरगन हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर सायन हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेला आरोपी सुरेश राजा देवेंद्र याला लोकलची धडक लागल्याने तोदेखील अपघातात जखमी झाला असून त्याच्यावरही सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान अॅण्टॉप हिल पोलिसांनी सुरेशविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
ही घटना गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता अॅण्टॉप हिल येथील सायन-कोळीवाडा, राजयोगी जैमलसिंग मार्ग, इमारत क्रमांक आठसमोरील चायनीस कॉर्नर दुकानाजवळ घडली. मनोज राजू देवेंद्र हा अॅण्टॉप हिल येथे राहतो. तो सध्या लोअर परेल येथील महालक्ष्मी डेव्हल्पर्स कंपनीत फिल्ड ऑफिसर म्हणून कामाला आहे. याच परिसरात त्याचा नातेवाईक मुरगन देवेंद्र हा राहत असून त्याच्या शेजारी सुरेश देवेंद्र हा राहतो. त्यामुळे ते सर्वजण एकमेकांच्या परिचित आहेत. गुरुवारी 2 ऑक्टोंबरला सुरेशने मुरगनच्या पत्नीला त्याच्यासोबत राहण्याचा सल्ला दिला होता. हा प्रकार पत्नीकडून समजताच मुरगन आणि सुरेश यांच्यात सायंकाळी सात वाजता शाब्दिक बाचाबाची झाली होती.यावेळी मुरगनने सुरेशला हाताने बेदम मारहाण केली होती.
हा प्रकार नंतर मुरगनने मनोज देवेंद्रला सांगून त्याचा संताप व्यक्त केला होता. रात्री पावणेबारा वाजता याच कारणावरुन मुरगन आणि सुरेश यांच्यात पुन्हा वाद झाला होता. ते दोघेही जोरजोरात आवाजात एकमेकांशी भांडण करत होते. हा प्रकार लक्षात येताच मनोजने त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी काही कळण्यापूर्वीच सुरेशने त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने मुरगनवर प्राणघातक हल्ला केला होता. छातीला आणि पोटाला गंभीर दुखापत झाल्याने मुरगन हा जागीच कोसळलाा.
हल्ल्यानंतर सुरेश हा तेथून पळून गेला. रक्तबंबाळ झालेल्या मुरगनला मनोजसह इतर स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच अॅण्टॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मनोज देवेंद्र यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर सुरेश देवेंद्रविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता.
ही शोधमोहीम सुरु असताना सुरेश हा लोकलची धडक लागून गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यामुळे पोलीस पथक सायन हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना सुरेश हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे समजले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जाते. हल्ल्यातील मुरगन आणि लोकल हल्ल्यात जखमी झालेला सुरेश हे दोघेही बोलण्याच्या स्थितीत नाही, त्यामुळे त्यांची नंतर जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.