पोलिसांत तक्रार केली म्हणून भावावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
हल्ला करणार्या पती-पत्नीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पोलिसांत तक्रार केली म्हणून मिथुन रामसुरत यादव या 24 वर्षांच्या तरुणावर त्याच्याच परिचित पती-पत्नीने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात मिथुन यादव हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी जावेद अन्वर खान आणि रुबी जावेद खान या पती-पत्नीविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत जावेदला पोलिसांनी अटक केली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्याची पत्नी रुबी हिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता सांताक्रुज येथील गझधरबांध, घराबाहेरील लाँड्री गल्लीतील सार्वजनिक शौचालयाजवळ घडली. मिथुन यादव हा एका खाजगी कंपनीत कामाला असून तो त्याच्या कुटुंबियांसोबत गझधरबांधच्या रामजी गुप्ता चाळीत राहतो. याच परिसरात खान कुटुंबिय राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. अलीकडेच मिथुनच्या भावाने जावेदविरुद्ध सांताक्रुज पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची माहिती समजताच जावेदला त्याच्या भावाबाबत प्रचंड राग होता.
गुरुवारी दुपारी दोन वाजता मिथुन हा परिसरातून जात होता. यावेळी तिथे जावेद आणि त्याची रुबी आली. त्यांनी त्याला भावाने त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्याचा जाब विचारुन त्याच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान काही कळण्यापूर्वीच जावेदने त्याच्याकडील कोयत्याने मिथुनवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या हाताला, डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी तातडीने मिथुनला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही माहिती मिळताच सांताक्रुज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मिथुनच्या जबानीवरुन हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी जावेदसह त्याची पत्नी रुबी यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच जावेदला पोलिसांनी अटक केली तर रुबीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. अटकेनंतर जावेदला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.