पैशांसह दारु पिण्यास मनाई म्हणून दोघांवर प्राणघातक हल्ला
मालाड-मानखुर्द येथील दोन्ही घटनेने तणावाचे वातावरण
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पैशांसह दारु पिण्यास नकार दिला म्हणून दोन वेगवेगळ्या घटनेत दोन व्यक्तींवर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार मानखुर्द आणि मालाड परिसरात उघडकीस आला आहे. या हल्ल्यात दिनेश वसंत घाग्रुम आणि समशुद्दीन सई मोहम्मद सहा असे दोनजण जखमी झाले असून त्यांना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. याप्रकरणी कुरार आणि ट्रॉम्बे पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येच्या प्रयत्नासह गंभीर दुखापत व खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. हल्ल्यानंतर दोन्ही हल्लेखोर पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
दिनेश वसंत घाग्रुम हा मानखुर्द परिसरात राहत असून केबल टेक्निशियन म्हणून काम करतो. याच परिसरात सुमीत आंग्रे हा राहत असून तो त्याचा मित्र आहेत. या दोघांना दारु पिण्याचे व्यसन असून अनेकदा ते दोघेही एकत्र मद्यप्राशन करण्यासाठी एकत्र बसत होते. 21 ऑक्टोंबरला दिनेश हा त्याच्या घरासमोर बसला होता. तिथे सुमीत हा फटाके फोडत होता, त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. नंतर त्यांच्यातील वाद त्यांनी आपसांत मिटविला होता. शनिवारी 25 ऑक्टोंबरला दिनेश हा त्याच्या मित्रांसोबत अग्यार बंगल्याच्या पॅसेजमध्ये मद्यप्राशन करत होता. यावेळी तिथे सुमीत आला असता दिनेशने त्याला त्यांच्यासोबत मद्यप्राशन करण्यास मनाई केली होती. त्यावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता.
पूर्वी फटाके फोडण्यावरुन आणि आता दारु पिण्यास मनाई केली म्हणून सुमीतच्या मनात प्रचंड राग होता. त्यामुळे त्याने ही काय तुझ्या बापाची जागा आहे का बोलून आज तुला गेम खलास करतो अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने त्याच्यावर त्याच्याकडील सुर्याने प्राणघातक हल्ला केला होता. यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांनाही जिवे मारण्याची धमकी देत आमच्या मध्ये पडू नकोस नाहीतर तुमचाही गेम करु अशी धमकी दिली. त्यामुळे त्याचे मित्र बाजूला झाले होते.
या हल्ल्यात दिनेश हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला त्याच्या भावासह मित्रांनी तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. ही माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी दिनेश घाग्रुम याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सुमीत आंग्रेविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
दुसरी घटना मंगळवारी 28 ऑक्टोंबरला मालाड येथील कुरार, रत्नागिरी हॉटेलसमोरील पार्किंगमध्ये घडली. समशुद्दीन सई मोहम्मद सहा हा गोरेगाव येथे रात असून सुतारकाम करतो. तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून गेल्या 21 वर्षांपासून मुंबई शहरात नोकरीसाठी राहतो. मंगळवारी तो त्याच्या बाईकवरुन फर्निचरचे सामान घेण्यासाठी गेला होता. रत्नागिरी हॉटेलसमोरील पार्किंगजवळ असताना तिथे एक तरुण आला. त्याच्या हातात चॉपर होता. घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्याने त्याच्याकडे पाच हजाराची मागणी केली होती. त्याने पैसे देण्यास नकार देताच त्याने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली.
त्याच्या खिशातील पाचशे रुपये काढत असताना समशुद्दीनने त्याला विरोध केला. यावेळी त्याने त्याच चॉपरने त्याच्या हातावर वार केले, तसेच तिथे आलेल्या लोकांकडे पाहत चॉपर भिरकावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर तो तेथून पळून गेला. याप्रकरणी समशुद्दीनच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध खंडणीसह गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला होता. पळून गेलेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.