पैशांवरुन सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर तलवारीने हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत सराईत गुन्हेगारांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 फेब्रुवारी 2026
मुंबई, – पैशांवरुन झालेल्या वादातून एका सतरा वर्षांच्या मुलावर दोन सराईत गुन्हेगारांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मानखुर्द परिसरात उघडकीस आली आहे. अनिकेत विजेंद्र गुदेरिया असे या जखमी मुलाचे नाव असून त्याच्यावर एलटीएमजे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच दोन्ही गुन्हेगारांना मानखुर्द पोलिसांनी अटक केली. रोहित अनिल हडाळे ऊर्फ डॉन आणि समद ऊर्फ मोहम्मद झैद निजामुद्दीन शेख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु घोरपडे यांनी दुजोरा दिला आहे.
ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता मानखुर्द येथील पीएमजीपी, जनकल्याण सोसायटीसमोर घडली. अनिकेत हा नवी मुंबईतील कामोठे, सेक्टर 34, मानसरोवर कॉम्प्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहतो. मंगळवारी सायंकाळी तो मानखुर्द येथे आला होता. जनकल्याण सोसायटीसमोर तो त्याचे मित्र आदी आणि संदीप यांच्यासोबत गप्पा मारत होता. यावेळी तिथे समद आला आणि त्याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. यावेळी अनिकेतने त्याला पैसे देण्यास नकार दिला. याच कारणावरुन समदसह रोहितने त्याच्याशी वाद घालून त्याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या डोक्याला, दंडाला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. यावेळी त्यांनी त्याच्याकडील एक हजार रुपयांची कॅश घेऊन तेथून पलायन केले होते.
हल्ल्यात जखमी झालेल्या अनिकेतला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच एलटीएमजे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु घोरपडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अनिकेतची पोलिसांनी जबानी नोंदवून त्याच्या तक्रारीवरुन समद आणि रोहित यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना बुधवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
यातील रोहितविुद्ध सातहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याचयाविरुद्ध दोन वर्षांसाठी मुंबईसह ठाणे शहरातून तडीपारची कारवाई झाली होती. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात पोलीस कोठडी सुनावली आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा देताना दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई करुन त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते, सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरु असल्याचे सांगितले.