नजर ठेवता या संशयावरुन तरुणाला चाकूने भोसकले

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल तर दोघांना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 फेब्रुवारी 2026
मुंबई, – नजर ठेवता या संशयावरुन एका 18 वर्षांच्या तरुणाला तिघांनी बेदम मारहाण करुन चाकूने भोसकल्याची घटना दहिसर परिसरात घडली. या हल्ल्यात विजय राजेंद्र चौहाण हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी तिन्ही मारेकर्‍याविरुद्ध दहिसर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अजीत सन्मुगम हरिजन ऊर्फ अण्णा आणि सुजल विष्णू निकम अशी या दोघांची नावे असून याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सुजल पांचाळ याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ही घटना सोमवारी 23 फेब्रुवारीला रात्री पावणेदहा वाजता दहिसर येथील रावळपाडा, एस. एन दुबे रोड, शनिमंदिरजवळ घडली. याच परिसरातील कोकणीपाडा, साईबाबा मंदिराजवळील गावदेवी नगरी चाळीत विजय चौहाण हा त्याची आई आणि बहिणीसोबत राहतो. तो त्याचा मित्र गणेश मल्हारी ताटे याच्यासोबत वेदांशी क्रिएशन या इमिटेशन ज्वेलरी कंपनीत पार्टटाईम काम करतो. सोमवारी रात्री पावणेदहा वाजता ते दोघेही कामावरुन सुटल्यांनतर त्यांच्या घरी पायी चालत जात होते.

शनिमंदिराजवळ येताच तिथे अजीत हरिजण, सुजल पांचाळ आणि सुजल निकम आले होते. ते तिघेही याच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. काहीही कारण नसताना या तिघांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. आमच्या नजर ठेवता काय, आता तुमचा गेम करतो अशी धमकी देऊन अजीतने त्याच्याकडून तिक्ष्ण हत्याराने विजयवर प्राणघातक हल्ला केला तर इतर दोघांनी त्याला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या हल्ल्यात त्याच्या मानेला, डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

हा प्रकार कोणालाही सांगितला तर परिणाम गंभीर होईल अशी धमकी देऊन ते तिघेही तेथून पळून गेले. या प्रकारानंतर स्थानिक रहिवाशांनी तातडीने रक्तबंबाळ झालेल्या विजयला समर्पण हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यांनतर त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ही माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी विजय चौहाणच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अजीत हरिजण आणि सुजल निकम या दोघांना पोलिसांनी अटक केली तर सुजल सुजल पांचाळ पळून गेला होता. अटकेनंतर या दोघांनाही दुसर्‍या दिवशी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page