मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मार्च 2026
मुंबई, – दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून इक्बाल सय्यद शेख या 35 वर्षांच्या व्यक्तीवर त्याच्या परिचित तरुणाने ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना डोंगरी परिसरात घडली. हल्ल्यात इक्बालच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जे. जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या कार्तिक आनंद कुमार या 26 वर्षांच्या हल्लेखोर तरुणाला अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना मंगळवारी 24 मार्चला सायंकाळी पावणेसहा वाजता डोंगरीतील मशिदबंदर, नंदलाल जानी मार्ग, दिल्ली स्ट्रिट शेजारी घडली. अमिना सय्यद शेख ही महिला पायधुनीतील कुर्ला स्ट्रिट, एम. गोडावूनसमोरील परिसरात राहत असून इक्बाल हा तिचा मुलगा आहे. याच परिसरात कार्तिक कुमार हा राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. कार्तिकला मद्यप्राशन करण्याचे व्यसन आहे. त्यातून तो अनेकांकडून अनेकदा दारुसाठी पैसे मागत होता. मंगळवारी सायंकाळी इक्बाल हा त्याच्या लाँड्रीचे कपडे देण्यासाठी घरातून निघाला होता. दिल्ली स्ट्रिट येथून जाताना त्याला कार्तिक भेटला आणि त्याने त्याच्याकडे दारुसाठी पैशांची मागणी केली होती.
त्याने त्याला खायाला देतो असे सांगून दारुसाठी पैसे देण्यास नकार दिला होता. त्याचा त्याला राग आला आणि त्याने त्याच्याकडील ब्लेडने इक्बालच्या गळ्याच्या दिशेने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता, त्यामुळे त्याला तातडीने स्थानिक रहिवाशांनी जवळच्या जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने इक्बालवर तातडीने औषधोपचार सुरु करण्यात आले होते. तिथे त्याला दाखल करण्यात आले आहे. ही माहिती प्राप्त होताच डोंगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी अमिना शेख हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कार्तिकविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या कार्तिकला काही तासांत पोलिसांनी डोंगरी येथून अटक केली. तपासात त्यानेच दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून इक्बालवर ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.