अनैतिक संबंधाच्या गैरसमजातून 26 वर्षांच्या तरुणाला चाकूने भोसकले

हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपी पती-पत्नीला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2026
मुंबई, – अनैतिक संबंधाच्या गैरसमाजातून झालेल्या वादातून एका 26 वर्षांच्या तरुणाला जोडप्याने बेदम मारहाण करुन त्याच्या पोटात चाकूने भोसकल्याची घटना वडाळ्यात घडली. या हल्ल्यात तरुणाच्या छातीला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी पती-पत्नीने पोलीस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केले. सादिक अब्दुल हुसैन शेख आणि हमीदा सादिक शेख अशी या आरोपी पती-पत्नीची नावे असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

24 वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या पतीसोबत नवी मुंबईतील उलवे, बामणडोंगरी परिसरात राहत असून पूर्वी ती अण्टॉप हिल परिसरात राहत होती. याच परिसरात डिसेंबर 2023 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत सादिक हा त्याची पत्नी हमीदा व त्याच्या मुलासोंबत भाड्याच्या त्यांच्याच मालकीच्या दुसर्‍या रुममध्ये भाडेकरु म्हणून राहत होते. एकाच परिसरात राहत असल्याने ते त्यांच्या परिचित होते. याच दरम्यान तक्रारदार महिला आणि सादिक यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन तिच्या पतीने सादिकशी वाद घातला होता. या वादानंतर सादिकने तिच्या पतीविरोधात अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांत तक्रार केली होती. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबियांमध्ये एकमेकांविरुद्ध प्रचंड राग होता.

सतत होणार्‍या भांडणानंतर सादिक हा त्याच्या कुटुंबियासोबत वडाळ्यातील चिंधी गल्ली, संगाल हॉस्पिटलजवळील दुसर्‍या ठिकाणी राहण्यासाठी निघून गेला होता. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता ती तिच्या पतीसोबत नवी मुंबईहून अ‍ॅण्टॉप हिल येथे आली होती. ती घरी निघून गेल्यानंतर तिचा पती कामासाठी बाहेर निघून गेला. रात्री साडेअकरा वाजता ती तिच्या पतीची अ‍ॅण्टॉप हिल येथील भरणीनाका, कोयता गल्लीत वाट पाहत होती. तेथून ते दोघेही नवी मुंबईतील त्यांच्या घरी जाणार होते. याच दरम्यान तिचा पती सेंगाल हॉस्पिटल, एमजी ग्रीन समोरील रस्त्यावरुन जात होता. तिथे त्याला सादिक आणि हमीदा भेटले होते.

जुन्या वादातून त्यांच्यात पुन्हा भांडण झाले होते. यावेळी या दोघांनी तिच्या पतीला शिवीगाळ करुन बेदम हातासह लाथ्यबुक्यांनी मारहाण केली होती. हा प्रकार तिला समजताच ती तिथे गेली होती. तिने त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान सादिकने त्याच्याकडील चाकूने त्याच्या पोटात भोसकले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. रक्तबंबाळ झाला असताना या दोघांनी त्याला मारहाण सुरुच ठेवली होती. त्यानंतर ते दोघेही तेथून निघून गेले. रक्तबंबाळ झालेल्या तिच्या पतीला स्थानिक लोकांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती मिळताच वडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तक्रारदार महिलेची जबानी नोंदवून पोलिसांनी सादिक आणि त्याची पत्नी हमीदा यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. अनैतिक संबंधाच्या जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page