क्रिकेट मॅच सोडून गेला म्हणून चौदा वर्षांच्या मुलाला चाकूने भोसकले
दोन्ही आरोपी मुलांची डोंगरीतील बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 एप्रिल 2026
मुंबई, – क्रिकेट मॅच सोडून गेला म्हणून रागाच्या भरात एका चौदा वर्षांच्या मुलाला त्याच्याच दोन मित्रांनी चाकूने भोसकल्याची घटना गोवंडी परिसरात उघडकीस आली आहे. या हल्लत अरसलान हा मुलगा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याच्यावर घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन हल्ल्यानंतर पळून गेलेल्या शयान आणि साहिल नावाच्या दोन्ही चौदा वर्षांच्या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दोघांनाही पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
ही घटना शनिवारी रात्री साडेनऊ ते पावणेदहा वाजता गोवंडीतील बैंगनवाडी, राजीव गांधी मैदान रोड क्रमांक बाराजवळ घडली. यातील तक्रारदार तरुण गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात राहत असून चौदा वर्षांचा अरसलान हा त्याचा लहान भाऊ आहे. याच परिसरातील एका खाजगी शाळेत शिकत असून त्याने अलीकडेच दहावीची परिक्षा दिली होती. शयान आणि साहिल हे दोघेही त्याचे मित्र असून ते दोघेही तिथेच राहतात. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता अरसलान हा शयान आणि साहिल यांच्यासोबत क्रिकेट मॅच पाहण्यासाठी गेला होता. यावेळी तक्रारदाराने त्याला आवाज देऊन घरी बोलावून घेतले होते. त्यामुळे तो क्रिकेट मॅच सोडून घरी गेला होता. त्याचा या दोघांच्या मनात राग होता.
रात्री साडेनऊ वाजता अरसलान हा त्यांच्या झेरॉक्स दुकानासमोर होता. यावेळी तिथे दोन्ही आरोपी मुले आले. क्रिकेट मॅच का सोडून गेलास असा जाब विचारुन या दोघांनी त्याला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. काही कळण्यापूर्वीच शयानने त्याच्याकडील चाकूने अरसलानवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर ते दोघेही पळून गेले होते. रक्तबंबाळ झालेल्या अरसलानला तातडीने एका खाजगी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
स्थानिक रहिवाशांकडून या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तक्रारदाराच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलाविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही आरोपी मुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ते दोघेही चौदा वर्षांचे असल्याने त्यांना नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. क्रिकेट मॅच सोडून आला म्हणून घडलेल्या या प्रकाराने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.