मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 जुलै 2025
मुंबई, – आर्थर रोड जेलमध्ये असताना क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून रोशन मंजूर आलम शेख या 25 वर्षांच्या तरुणावर त्याच्याच परिचित आरोपीने तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. या हल्ल्यात रोशन हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच रेहान ऊर्फ चिकना संतोष शेख या आरोपीस आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे. रेहान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आरसीएफ पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल आहेत.
ही घटना शनिवारी पहाटे साडेचार वाजता चेंबूर येथील वाशीनाका, नवभारत सोसायटीच्या इमारत क्रमांक सातजवळ घडली. याच परिसरातील एच. पी कॉलनी रोड, साईनाथ साईनाथ सोसाटीमध्ये रोशन हा राहतो. काही महिन्यांत रोशनला पोलिसांनी एका गुन्ह्यांत अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तिथेच त्याची रेहानशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. मात्र जेलमध्ये असताना त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर रोशनने रेहानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने जामिन मंजूर केला होता.
शनिवारी रोशन हा नवभारत सोसायटीजवळ चहा पिण्यासाठी जात होता. यावेळी तिथे रेहान आला आणि त्याने जेलमध्ये झालेल्या वादाचे कारण पुढे करुन त्याच्याशी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली होती. यावेळी रोशनने त्याला जे झाले ते विसरुन जा असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने शिवीगाळ करुन त्याच्यावर त्याच्याकडील चाकूने वार करण्यास सुरुवात केली होती. त्यात त्याच्या चेहर्याला, हाताला, मानेला आणि बरगडीला गंभीर दुखापत झाली होती. यावेळी काही लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर तो तेथून पळून गेला.
घटनास्थळी गेलेल्या आरसीएफ पोलिसांनी तातडीने जखमी रोशनला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी रोशनच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रेहानविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या रेहानला काही तासांत पोलिसांनी अटक केली. रेहानविरुद्ध आरसीएफ पोलीस ठाण्यात पाचहून अधिक गुन्हे दाखल आहे. त्याच्या वाढत्या कारवायानतर त्याला दोन जामिनदारासह एक व तीन वर्षांसाठी पोलिसांनी बंधपत्र घेतले होते. तरीही त्याच्या कारवाया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.