मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 जुलै 2025
मुंबई, – झाड तोडण्यासाठी दोन लाखांच्या खंडणीची मागणी करुन खंडणीची रक्कम देण्यास नकार दिला म्हणून दोघांनी एका व्यक्तीवर रॉकेल ओतल्याची घटना सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह खंडणीसाठी धमकी देणे आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत डॉमनिक अॅन्थोनी फर्नाडिस याला पोलिसांनी अटक केली तर बॅनिडीक अॅन्थोनी फर्नाडिस याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
ही घटना सोमवारी दुपारी दिड वाजता सांताक्रुज येथील जुहू-तारा रोड, मांगेलवाडी, मायक्रो हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकी प्लॉटवर घडली. अनिल जीवन मांगेला हे याच परिसरात राहत असून साईट सुपरवायझर म्हणून कामाला आहेत. सोमवारी दुपारी ते मायक्रो हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकी प्लॉटवरील झाड तोडत होते. यावेळी तिथे डॉमनिक आणि बॅनिडिक आले. त्यांनी त्यांना झाड तोडण्यास विरोध केला. झाड तोडण्यासाठी त्यांच्याकडे दोन लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार देताच डॉमनिकने त्याच्या घरातून पेट्रोल आणले आणि त्यांनी अनिल मांगेला यांच्यावर पेट्रोल ओतले.
त्यानंतर ते पुन्हा घरी माचिस आणण्यासाठी गेले होते. यावेळी त्याने त्यांना आज तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. जीवन मांगेला आणि व त्यांच्या पत्नीला हाताने बेदम मारहाण केली. त्यात जीवन यांना दुखापत झाली होती. ही माहिती प्राप्त होताच सांताक्रुज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेनंतर जीवन मांगेलासह इतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी जीवन यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डॉमनिक आणि बॅनिडिक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर डॉमनिकला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत बॅनिडिकला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.