मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० फेब्रुवारी २०२४
अंबरनाथ – मद्यप्राशन करताना झालेल्या क्षुल्लक वादातून एका ३२ वर्षांच्या तरुणाच्या गळ्यावर त्याच्याच मित्राने फुटलेल्या बाटलीने वार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ परिसरात घडली. या हल्ल्यात राजेश राजगोपालन पलकंडी हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून आरोपी मित्र जॅक्शन यशोदास डेव्हीड याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना सोमवारी १९ फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता अंबरनाथ येथील वांद्रापाडा, सुभाषवाडीतील यशोदा बारमध्ये घडल्याचे पोलिसांनी सांगितले. राजेश हा अंबरनाथ येथे राहत असून आरोपी जॅक्शन हा त्याचा मित्र आहे. सोमवारी दुपारी ते दोघेही यशोदा बारमध्ये मद्यप्राशन करत होते. यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात जॅक्शनने राजेशच्या गळ्यावर फुटलेल्या बाटल्या वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. ही माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या राजेशला पोलिसांनी तातडीने जवळच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी नयनीश प्रकाश महाडदळकर यांच्या तक्रारीवरुन अंबरनाथ पोलिसांनी जॅक्शन डेव्हीडविरुद्ध शिवीगाळ करुन हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत जॅक्शनला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या दोघांमध्ये कुठल्या विषयावर वाद झाला याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बेळगे करत आहेत.