मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – रिक्षा प्रवासादरम्यान एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील इशार्याद्वारे संभाषण करुन तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दखल होताच पळून गेलेल्या रिक्षाचालकाला काही तासांत सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. संजय कैलास यादव असे या ३५ वर्षीय रिक्षाचालकाचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशच्या जोधपूर, फुंवरपूरच्या बरेली जोनपूरचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
१६ वर्षांची तक्रारदार मुलगी ही अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहत असून सध्या शाळेत शिकते. सोमवारी सकाळी पावणेबारा वाजता ती वर्सोवा मेट्रो बसस्टॉप येथून रिक्षाने शाळेत जाण्यासाठी निघाली होती. यावेळी रिक्षाचालक संजय यादव हा तिला विनाकारण विविध प्रश्न विचारत होता. यावेळी त्याने तिचा मोबाईल क्रमांक मागितला. रिक्षातील आरशाकडे पाहून तिच्याशी अश्लील इशारे करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. मात्र तिने त्याच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले होते. वांद्रे येथील कॉलेजजवळ आल्यानंतर त्याने तिचा हात पकडून जोरात दाबण्याचा प्रयत्न केला. तिने हात सोडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता. घडलेला प्रकार तिने सांताक्रुज पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पळून गेलेल्या रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत संजय यादवला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने तिच्याशी अश्लील लगट करण्याचा प्रयत्न करुन तिचा विनयभंग केल्याची कबुली दिली होती. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.