मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० फेब्रुवारी २०२५
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका बाईकच्या धडकेने रशीद सुल्तान शेख या ३४ वर्षांच्या पादचार्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी धवल गणेश वैद्य या बाईकस्वाराविरुद्ध हलर्जीपणाने बाईक चालवून एका पादचार्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
हा अपघात शनिवारी रात्री साडेआठ वाजता सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील महानगरपालिका रोड, किल्ला कोर्टाच्या गेटसमोर झाला. शनिवारी रात्री साडेआठ वाजता धवल वैद्य हा त्याच्या ट्रम्प कंपनीच्या काळ्या रंगाच्या बाईकवरुन मेट्रो सिनेमाकडून सीएसएमटीच्या दिशेने भरवेगात जात होता. ही बाईक किल्ला कोर्टाच्या गेटसमोरच येताच त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावरुन जाणार्या एका पादचार्याला जोरात धडक दिली. या अपघातात रशीद शेख हा गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच आझाद मैदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
जखमी झालेल्या रशीदला पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर योगेश चौरगे यांच्या तक्रारीवरुन आझाद मैदान पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी ३० वर्षांचा बाईकस्वार धवल वैद्य याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.