मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ एप्रिल २०२४
मुंबई, – बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन एका ज्वेलर्स व्यापार्याच्या कर्मचार्याच्या बॅगेतून हिरे आणि सोन्याचे दागिने घेऊन पळून गेलेल्या एका सराईत गुन्हेगाराला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. मोहम्मद शमीम यासीन कुरेशी असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी साडेचार लाखांचे हिरे, सोनसाखळी असा शंभर टक्के मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
४७ वर्षांचे तक्रारदार कफ परेड येथे राहतात. ते कुलाबा येथील एका ज्वेलर्स दुकानात ऑफिसबॉय म्हणून कामाला आहे. २७ मार्चला ते दुकानातील हिरे आणि सोन्याचे दागिने घेऊन कुलाबा-डी. एन रोड असा बसने प्रवास करत होते. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँगेतून चार लाख २३ हजार रुपयांचे हिरे आणि २५ हजाराचे सोन्याची चैन असा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर लक्षात येताच त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रॉबरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील, पोलीस शिपाई कटरे, हिरे, पाटील, किर्तीकर, मुंढे यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने पवई येथून मोहम्मद शमीमला चौकशीासाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचे सर्व हिरे आणि दागिने हस्तगत केले आहेत. तपासात मोहम्मद शमीम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध भायखळा, कुलाबा, ताडदेव, भोईवाडा, पायधुनी पोलीस ठाण्यात सहाही गुन्हे दाखल आहेत. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील हे करत आहेत.