मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2025
मुंबई, – व्यापारी मालकाच्या मुलीला परिक्षा केंद्रावर कारचालकाने कार घेऊन पलायन केल्याची घटना घडली. याप्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेला कारचालक प्रतिक आनंद झुंजार याला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून अपहार केलेली कारसह टॅब असा सात लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
अमोल सत्यनारायण कासट हे ठाण्याचे नौपाडा परिसरात राहत असून कापड व्यापारी आहेत. त्यांची सतरा वर्षांची मुलगी असून तिची डिझाईन सीईटीची परिक्षा सर जे. जे स्कूल ऑफ ऑर्टमध्ये होती. परिक्षेला उशीर होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचा कारचालक प्रतिक झुंजार याला कारने परिक्षा केंद्रावर सोडण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर प्रतिक या मुलीसह तिच्या चार मैत्रिणीला घेऊन सर जे जे स्कूल ऑफ आर्टजवळ आला होता. तिथे त्यांना सोडून तो निघून गेला.
दुपारी परिक्षा संपल्यानंतर तो सर्वांना घेऊन पुन्हा ठाण्याला येणार होता, त्यामुळे अमोल कासट यांच्या पत्नीने त्याला फोन केला होता, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. परिक्षा संपल्यानंतर त्यांच्या मुलीने त्याला कॉल केला, यावेळी त्याचा मोबाईल बंद असल्याचे दिसून आले. प्रतिक हा कारसह टॅब घेऊन पळून गेल्याची खात्री होताच अमोल कासट यांनी आझाद मैदान पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता.
सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक दळवी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा खंडागळे, अश्विनी ठेमस्कर, पोलीस हवालदार राजेंद्र कटरे, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मुंढे, सचिन पाटील, गोपीनाथ पाटील, अमरदीप किर्तकर यांनी प्रतिकला सातारा येथील ठोसेघर, चिखली येथून ताब्यात घेतले. त्याने कार रायगड येथील रोहा परिसरात लपवून ठेवली होती. ही कारसह टॅब असा सात लाख ऐंशी लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.