मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 ऑगस्ट 2025
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राज्यमंत्री झियाउद्दीन अब्दुल रहिम सिद्धीकी ऊर्फ बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका आरोपीला पुण्यातून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. अमोल गायकवाड असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा पुण्याचा रहिवाशी आहे. त्याच्यावर कटातील मुख्य आरोपींना लॉजिस्टिक मदत केल्याचा आरोप असून गुन्हा दाखल होताच तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला विशेष मोक्का कोर्टाने 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता 27 झाली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत 26 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
12 ऑक्टोंबर 2024 रोजी बाबा सिद्धीकी यांची वांद्रे येथील झिशान सिद्धीकी यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकणी निर्मलनगर पोलिसांनी हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. या गुन्ह्यांचा तपास हाती घेताना गोळीबारानंतर पळून जाणार्या गुरमेल बलजीत सिंग आणि धर्मराज राधे कश्यप या दोन शूटरला पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून या संपूर्ण हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या कटात कोणाचा सहभाग होता याचे नाव समोर आले होते. त्यांनतर गुन्हे शाखेच्या विविध पथकाने पुणेसह पंजाब आणि इतर राज्यातून इतर 26 आरोपींना अटक केली होती. या सर्वांविरुद्ध नंतर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण होताच जानेवारी 2025 रोजी 26 आरोपींविरुद्ध गुन्हे शाखेने मोक्का कोर्टात आरोपपत्र सादर केले होते. 4590 पानांच्या या आरोपपत्रात 180 जणांची जबानी नोंदविण्यात आली होती. या गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी पाच देशी बनावटीचे पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, सहा मॅगझीन, 84 जिवंत काडतुसांचा साठा जप्त केला आहे.
गुन्हेगारी जगतात स्वतच्या टोळी वर्चस्व स्थापन करण्यासाठी बिश्नोई टोळीचा मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई याने त्याच्या सहकार्यांच्या मदतीने बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. तसेच बाबा सिद्धीकी यांचे सिनेअभिनेता सलमान खानसोबत जवळचे संबंध होते. त्यामुळे सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर गोळीबार केल्यानंतर त्यांनी बाबा सिद्धीकी यांना टार्गेट केले होते. त्यांच्या हत्येनंतर बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती. ही दहशत निर्माण व्हावी यासाठी अनमोल बिश्नाईने बाबा सिद्धीकी यांची हत्या घडवून आणल्याचे तपासात उघडकीस आले होते.
या गुन्ह्यांत अमोल गायकवाड हा वॉण्टेड आरोपी होता. तो पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. त्याच्या अटकेसाठी पोलिसांकडून विशेष शोधमोहीम सुरु होती. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला पुण्याहून खंडणीविरोधी पथकाने अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत त्याला मोक्का कोर्टाने 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता 27 झाली आहे. अमोल हा शुभम लोणकर आणि प्रविण लोणकर या दोन बंधूंच्या संपर्कात होता. त्याला या कटाची माहिती होती. तो काही आरोपींना घेऊन मुंबईत आला होता. त्यानतर त्याने काही ठिकाणांची रेकी केल्याचे तपासात उघडकीस आले होते.