पुण्यातून दोन वॉण्टेड आरोपींना अटक व पोलीस कोठडी
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी हत्येप्रकरण
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी वॉण्टेड असलेल्या दोन आरोपींना पुण्यातून अटक करण्यात खंडणीविरोधी पथकाला यश आले आहे. आदित्य राजू गुळणकर आणि रफिक नियाज शेख अशी या दोघांची नावे असून त्यांच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या आता अठरा झाली आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी यापूर्वी अटकेत असलेल्या प्रविण लोणकर आणि रुपेश मोहोळ यांच्या संपर्कात होते. हत्येसाठी वाापरण्यात येणार्या शस्त्रांच्या देवाणघेवाणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली होती. या कटात त्यांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या महिन्यांत दसर्याच्या दिवशी वांद्रे येथे बाबा सिद्धीकी यांची तीन अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर आतापर्यंत पोलिसांनी पंधरा आरोपींना अटक केली होती. त्यात गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप, प्रविण रामेश्वर लोणकर, हरिशकुमार बालकराम निशाद, नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया, भगवतसिंग ओमसिंग, अमीत हिसमसिंग कुमार, रुपेश राजेंद्र मोहोळ, करण राहुल साळवे, शिवम अरविंद कोहाड, सुजीत सुशील सिंग या आरोपींचा समावेश होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी गौरव विलास आपुणे या २३ वर्षांच्या तरुणाला पुण्यातून अटक केली होती. त्यानेच हत्येतील शूटर्संना शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून रफिक शेख आणि आदित्य गुळणकर यांचे नावे समोर आली होती. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने पुण्यातून या दोघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले.
चौकशीत ते दोघेही पुण्यातील कर्वेनगरचे रहिवाशी आहे. ते दोघेही या गुन्ह्यांतील अटकेत असलेले आरोपी प्रविण लोणकर आणि रुपेश मोहोळ यांच्या संपर्कात होते. गुन्ह्यांत वापरण्यात आलेले ९ एमएम बनावटीचे पिस्तूल आणि राऊंड त्यांच्याकडे देण्यात आले होते. ते शस्त्रे त्यांनी शूटरला दिले होते. ते पिस्तूल पोलिसांनी जप्त केले असून त्यांच्याकडून आणखीन काही शस्त्रसाठा जप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत यापूर्वी पोलिसांनी पंधरा तर दोन दिवसांत तीन आरोपींना पुण्यातून अटक केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता अठरा झाली आहे. त्यापैकी तीन आरोपी पोलीस तर उर्वरित सर्वजण न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.