मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येतील आरोपींना आर्थिक मदत करणार्या आरोपीला गजाआड करण्यात गुन्हे शाखेला अटक केली. सुमीत दिनकर वाघ असे या आरोपीचे नाव असून त्याला अकोला येथून ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. या कटात अटक झालेला सुमीत हा २६ वा आरोपी आहे. त्याच्यावर कटातील आरोपींना ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्यास तसेच बँकेत खाते उघडण्यास मदत केल्याचा आरोप आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ऑक्टोंबर महिन्यांत दसर्याच्या दिवशी वांद्रे येथे बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा तपास नंतर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच तिन्ही शूटरसह २५ आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली होती. गेल्याच आठवड्यात या गुन्ह्यांत सलमानभाई इक्बालभाई बोहरा याला अकोला येथून पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीतून सुमीत वाघ याचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांची एक टिम नागपूरला गेली होती. या पथकाने अकोला येथून सुमीतला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली.
सुमीत हा अकोला येथील अकोट, पणजचा रहिवाशी आहे. त्याने गुजरातच्या कर्नाटक बँकेत उघडलेल्या बँक खात्यातून नरेशकुमार, रुपेश मोहोळ, हरिशकुमारला ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर केले होते. या गुन्ह्यांतील अटकेत असलेला आरोपी सलमानभाई बोहरा यासाठी त्याने सिमकार्ड खरेदी करुन त्याचा वापर इंटरनेट बॅकिंगसाठी केला होता. सुमीत या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी शुभम लोणकर याच्या संपर्कात होता. त्याच्याच सांगण्यावरुन त्याने हत्येसाठी आलेली रक्कम इतर आरोपींच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. सलमानभाईला बँकेत खाते उघडण्यास त्याने मदत केल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे. त्यानंतर त्याला किल्ला कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.