बाबा सिद्धीकी हत्येप्रकरणी संशयित पोलिसांच्या ताब्यात

वॉण्टेड आरोपी मोहम्मद जिशान अख्तरच्या संपर्कात होता

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पंजाबच्या लुधियाना शहरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सुजीत सुशील सिंग असे या संशयिताचे नाव असून त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे. सुजीत हा वॉण्टेड आरोपी मोहम्मद जिशान अख्तरचा खास सहकारी असून त्याला बाबा सिद्धीकी यांच्या हत्येची माहिती होती. त्यामुळे तो एक महिन्यांपूर्वीच मुंबईतून पंजाबला पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर खंडणीविरोधी पथकाने आतापर्यंत चौदा आरोपींना अटक केली आहे. याच गुन्ह्यांत सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून दररोज नवीन माहिती पुढे येत आहे. या माहितीवरुन इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना एक टिम पंजाबला गेली होती. या टिमने शुक्रवारी सुजीत सिंग याला लुधियाना येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आतापर्यंतच्या चौकशीत सुजीत हा वॉण्टेड आरोपी मोहम्मद जिशान अख्तरचा खास सहकारी म्हणून परिचित आहे. तो त्याच्याच संपर्कात होता. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येच्या कटाची माहिती त्याला मोहम्मद जिशानकडून समजली होती. त्यामुळे हत्येच्या एक महिना आधीच तो मुंबईतून पळून गेला होता. सुजीत हा मूळचा उत्तरप्रदेशच्या लखनऊचा रहिवाशी आहे. तो घाटकोपर येथील छेडानगर परिसरात राहत होता. तिथे त्याची ओळख मोहम्मद जिशानची झाली होती. त्यानेच त्याची ओळख करुन या कटातील दोन आरोपी राम कनोजिया आणि नितीन सप्रे यांच्याशी करुन दिली होती. या दोघांसोबत त्याची दोन ते तीन वेळा भेट झाली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाले होते. सुजीतला बाबा सिद्धीकी यांच्या हत्येची पूर्वकल्पना होती. त्यामुळे तो हत्येपूर्वी मुंबईतून पळून गेला होता.

या दोघांच्या चौकशीत सुजीतचा सहभाग उघडकीस आले होते. याच गुन्ह्यांत गुन्हे शाखेने पुण्यातून एक पिस्तूल, तीन काडतुसे तर अन्य काही शस्त्रे जप्त केली आहेत. हत्येत शूटर म्हणून सहभागी केलेल्या गुरमेलविरुद्ध हत्येच्या एका गुन्ह्यांची नोंद होती. या गुन्ह्यांत त्याला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होईल असे वाटत होते. त्यामुळे त्याला बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कटात सामिल करण्यात आले होते. हा कट यशस्वी झाल्यास त्याला कायमचे विदेशात पाठविण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यामुळे तो या कटात सामिल झाला होता असे तपासात उघडकीस आले आहे. मात्र हत्येनंतर पळून जाताना त्याला पोलिसांनी अटक केली. आता या दोन्ही गुन्ह्यांतून त्याची सुटका नाही हे त्याला कळून चुकले आहे.
नऊ आरोपींच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या नऊ आरोपींना शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वांना शनिवारी दुपारी पुन्हा किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. याच गुन्ह्यांत इतर दोघांचीही पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपत आहे. गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप, प्रविण रामेश्‍वर लोणकर, हरिशकुमार बालकराम निशाद, नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया अशी या नऊ आरोपींची नावे आहेत. या सर्वांना एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने त्यांना पुन्हा पोलीस मुख्यालयात पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page