नेपाळला पळण्याच्या तयारीत असलेल्या शूटरसह चौघांना अटक

बाबा सिद्धीकी हत्येत उत्तरप्रदेश एसटीएफ-मुंबई पोलिसांची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० नोव्हेंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर मुंबईतून पुणे, झांसी, लखनऊ आणि नंतर बहराईच येथून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तिसर्‍या शूटरसह त्याला मदत करणार्‍या चार सहकार्‍यांना अखेर अटक करण्यात उत्तरप्रदेश स्पेशल टास्क फोर्स आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना या पाचही आरोपींना पकडण्यात आले असून अटकेनंतर सर्वांना लवकरच ट्रॉन्झिंट रिमांडवर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार आहे. अटक आरोपींमध्ये शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा बालकिशन गौतम, अनुराग राधेश्याम कश्यप, ज्ञानप्रकाश प्रदीपकुमार त्रिपाठी, आकाश बृजकुमार श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रतापसिंह सुरेशसिंह यांचा समावेश असून यातील शिवकुमार हा बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करणारा शूटर आहे. हल्ल्यानंतर तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता, अखेर एक महिन्यानंतर त्याला पकडण्यात आले. या पाचजणांच्या अटकेनंतर या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता २३ झाली आहे.

गेल्या महिन्यांत दसर्‍याच्या दिवशी रात्री वांद्रे येथे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी ऊर्फ जियाउद्दील अब्दुल रहिम सिद्धीकी यांची तीन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या गोळीबारानंतर पळून जाणार्‍या गुरमेल बलजीत सिंग आणि धर्मराज राधे कश्यप या दोन्ही शूटरला गस्तीवर असलेल्या पोलिसांनी अटक केली होती. या दोघांच्या अटकेनंतर सोळा आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली होती. त्यात प्रविण रामेश्‍वर लोणकर, हरिशकुमार बालकराम निशाद, नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया, भगवतसिंग ओमसिंग, अमीत हिसमसिंग कुमार, रुपेश राजेंद्र मोहोळ, करण राहुल साळवे, शिवम अरविंद कोहाड, सुजीत सुशील सिंग, गौरव विलास आपुणे, आदित्य राजू गुळणकर आणि रफिक नियाज शेख यांचा समावेश होता. त्यापैकी तीनजण पोलीस तर इतर पंधरा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या हत्येनंतर तिसरा शूटर शिवकुमार गौतम हा पळून गेला होता. अटक आरोपींच्या चौकशीत शिवकुमारसह शुभम लोणकर आणि मोहम्मद जिशान अख्तर यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना तिसरा शूटर शिवकुमार हा कायमचा नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती युपीच्या एसटीएफला मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने मुंबई पोलिसांच्या मदतीने बहराईचच्या नानपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपलेल्या शिवकुमारचा शोध सुरु केला होता. ही शोधमेाहीम सुरु असताना शिवकुमारसह त्याचे चार सहकारी अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव, अखिलेंद्र सुरेशसिं या पाचजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांनी ते सर्वजण नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली होती. तपासात शिवकुमार हा धर्मराज कश्यप हे एकाच गावचे रहिवाशी आहे. तो पुण्यात भंगार विक्रीचे काम करत होता. तिथेच त्याची शुभम लोणकरशी ओळख झाली होती. या दोघांचे भंगार दुकान बाजूला होते. शुभम हा लॉरेन्स बिष्णोईसाठी काम करत होता. लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिष्णोईशी तो स्नॅपचॅटच्या माध्यमातून संपर्कात होता. या दोघांमध्ये अनेकदा संभाषण झाले होते. अनमोलने शुभमच्या मदतीने शिवकुमारला बाबा सिद्धीकी यांच्या हत्येत सामिल करुन घेतले होते. हत्येनंतर त्यांना दहा लाख रुपये देण्याचे तसेच दरमाह काही ना काही काम देणार असल्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. हत्येसाठी शुभमने त्याला शस्त्रे, काडतुसे, सिमकार्ड, मोबाईल दिले होते. याकामी त्याला मोहम्मद जिशान अख्तरने मदत केली होती. हत्येदरम्यान त्यांना दिलेल्या मोबाईलवर ते दोघेही संपर्कात होते. मुंबईत वास्तव्यास असताना त्यांनी बाबा सिद्धीकी यांच्या घरासह कार्यालयात अनेकदा रेकी केली होती.

१२ ऑक्टोंबरला संधी मिळताच शिवकुमारसह गुरमेल आणि धर्मराजने बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या केली आणि ते तिघेही पळून गेले होते. यावेळी गुरमेल आणि धर्मराज पकडले गेले तर शिवकुमार पळून जाण्यात यशस्वी झाला. तो मुंबईतून पुण्यात आणि नंतर झांसी आणि लखनऊला गेला. प्रवासादरम्यान त्याने एका प्रवाशाकडून फोन करुन अनुराग कश्यपला संपर्क साधला होता. त्याने त्याला अखिलेंद्र, ज्ञानप्रकाश आणि आकाश हे तिघेही याला नेपाळला पळून जाण्यात मदत करतील असे सांगतले. त्यानंतर तो नेपाळला पळून जाण्यासाठी बहराईचला आला होता. त्याच्यासोबत अटक केलेल्या चौघांनी त्याची नेपाळला पळून जाण्याची सर्व व्यवस्था केली होती. मात्र नेपाळला पळून जाण्यापूर्वीच ते सर्वजण पोलिसांच्या जाळ्यात सापडले. या पाचही आरोपींना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार आहे. त्यानंतर त्यांना किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे. शुभम रामेश्‍वर लोणकर आणि मोहम्मद जिशान अख्तर या दोघासह इतरांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page