बाबा सिद्धीकी हत्येतील आरोपींच्या अटकेचे सत्र सुरुच
पंजाबहून शूटरला लॉजिस्टिक सपोर्ट देणार्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येतील आरोपींच्या अटकेचे सुरुच असून या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या अन्य एका आरोपीस पंजाब येथून मुंबई पोलिसांसह पंजाब पोलिसांच्या ऍण्टी गॅगस्टर टास्क फोर्सच्या अधिकार्यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अटक केली. आकाशदिप कारजसिंग गिल असे या २२ वर्षीय आरोपीचे नाव असून तो बिष्णोई टोळीचा सदस्य आहे. बाबा सिद्धीकी हत्येतील तिन्ही शूटरला लॉजिस्टीक सपोर्ट दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. टान्झिंट रिमांड घेतल्यांनतर त्याला रात्री उशिरा मुंबईत आणून रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या महिन्यांत दसर्याच्या दिवशीच माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांची तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे असून याच गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी २३ आरोपींना अटक केली आहे. गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप, प्रविण रामेश्वर लोणकर, हरिशकुमार बालकराम निशाद, नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया, भगवतसिंग ओमसिंग, अमीत हिसमसिंग कुमार, रुपेश राजेंद्र मोहोळ, करण राहुल साळवे, शिवम अरविंद कोहाड, सुजीत सुशील सिंग, गौरव विलास आपुणे, आदित्य राजू गुळणकर आणि रफिक नियाज शेख, शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा बालकिशन गौतम, अनुराग राधेश्याम कश्यप, ज्ञानप्रकाश प्रदीपकुमार त्रिपाठी, आकाश बृजकुमार श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रतापसिंह सुरेशसिंह यांचा समावेश आहे. त्यापैकी शिवकुमारसह त्याचे चार सहकारी १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस तर इतर सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
आरोपींच्या चौकशीतून या कटातील साखळीचा पर्दाफाश पोलिसांना यश आले होते. त्यात आकाशदिप गिल या आरोपीचा समावेश होता. मात्र गोळीबारानंतर तो पळून गेला होता. गेल्या दिड महिन्यांपासून तो फरार होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुर असताना आकाशदिप हा पंजाब येथे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तो पंजाबच्या फाजिल्का, चिस्ती गावचा रहिवाशी होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांची एक टिम पंजाबला गेली होती. या पथकाने पंजाब पोलिसांच्या ऍण्टी गॅगस्टर टास्क फोर्सच्या (एजीटीएफ) मदतीने वॉण्टेड असलेल्या आकाशदिपला अटक केली. अटकेनंतर त्याला तेथील लोकल कोर्टात हजर करुन त्याची टान्झिंट रिमांड घेण्यात आली होती. त्यानंतर त्याचा ताबा घेऊन मुंबई पोलीस पुढील कारवाईसाठी मुंबईत निघाले होते. याच गुन्ह्यांत त्याला रविवारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे.
आतापर्यंतच्या चौकशीत आकाशदिप हा बिष्णोई टोळीचा सदस्य असून त्याने बिष्णोईच्या सांगण्यावरुन बाबा सिद्धीकी यांच्या तिन्ही शूटरला मदत केली होती. या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याला वॉण्टेड दाखविण्यात आले होते. अखेर त्याला दिड महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या २४ झाली आहे.