बाबा सिद्धीकी हत्येतील आरोपींचा जामिन अर्ज कोर्टाने फेटाळला
दोन्ही आरोपीविरुद्ध भक्कम पुरावा असल्याचा पोलिसांचा दावा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 सप्टेंबर 2025
मुंबई, – माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत माजी आमदार बाबा सिद्धीकी हत्येतील दोन आरोपी सलमान इक्बाल बोहरा आणि प्रदीप दत्तू ठोंबरे यांच्या जामिन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी दोन्ही आरोपींचे जामिन अर्ज मोक्का कोर्टाने फेटाळून लावले. या दोघांविरुद्ध भक्कम पुरावा असल्याचा दावा करुन तपास अधिकार्यांनी त्यांच्या जामिनाला विरोध केल्याचे सांगण्यात आले.
बाबा सिद्धीकी हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि माजी मंत्री आहे. 12 ऑक्टोंबर 2024 रोजी ते त्यांच्या घराच्या दिशेने जात होते. वांद्रे येथून जात असताना भरस्त्यात त्यांची तीन मारेकर्यांनी गोळीबार करुन हत्या केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच तिन्ही शूटरसह 26 आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली होती. या आरोपीविरुद्ध नंतर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. याच कायद्यातंर्गत सर्व आरोपीसह वॉण्टेड आरोपीविरुद्ध गुन्हे शाखेने मोक्का कोर्टात आरोपपत्र सादर केले होते. सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत कारागृहात बंदिस्त आहेत.
आरोपपत्र सादर करण्यात आल्याने सलमान बोहरा आणि प्रदीप ठोंबरे यांनी त्यांच्या वकिलामार्फत मोक्का कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. या जामिन अर्जावर बुधवारी अंतिम सुनावणी पूर्ण झाली होती. दोन्ही आरोपींच्या जामिन अर्जाला सहाय्यक पोलीस आयुक्त किशोरकुमार शिंदे आणि पोलीस निरीक्षक तरळगट्टी यांनी विरोध करताना त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचा दावा केला.
या संपूर्ण कटात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे या दोघांनाही कोर्टाने जामिन मंजूर करु नये असा युक्तिवाद तपास अधिकार्यांच्या वतीने सरकारी वकिलांनी केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर मोक्का कोर्टाने सलमान बोहरा आणि प्रदीप ठोंबरे यांचा जामिन अर्ज फेटाळूल लावला होता. त्यामुळे या दोघांना आता मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे.