२४ तास उलटूनही बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचे कारण स्पष्ट नाही
हत्येप्रकरणी दोन शूटरसह तिघांना अटक; दोघांना पोलीस कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राज्याचे माजी मंत्री, आमदार आणि अजीत पवार गटाचे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे नेते झियाउद्दीन अब्दुल रहिम सिद्धीकी ऊर्फ बाबा सिद्धीकी यांच्या हत्येला २४ तास उलटूनही या हत्येमागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तपास सुरु असल्याचे सांगून मुंबई पोलिसांनी हत्येमागील कारणाबाबत कमालीचे गुप्तता ठेवली आहे. दरम्यान बाबा सिद्धीकी हत्येप्रकरणी दोन शूटरसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राजेश कश्यप आणि प्रविण लोणकर अशी या तिघांची नावे आहेत. यातील गुरमेल हा हरियाणा, धर्मराज उत्तरप्रदेशचा तर भाऊ लोणकर हा पुण्याचा रहिवाशी आहे. गुरमेल आणि धर्मराजला किल्ला कोर्टाने २१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर प्रविणला सोमवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. आरोपींकडून पोलिसांनी दोन पिस्तूल मॅगझीनसह, २८ जिवंत काडतुसे, एक स्वतंत्र मॅगझीन, चार मोबाईल, दोन आधारकार्ड आणि एक निळ्या रंगाची सॅक बॅग जप्त केली आहे.
श्याम मगन सोनावणे हे पोलीस शिपाई असून ते सध्या सुरक्षा शाखा पी-एकमध्ये कार्यरत आहे. ते बाबा सिद्धीकी यांच्याकडे मे २०२१ पासून वैयक्तिक सुरक्षा अंगरक्षक म्हणून कामाला आहे. त्यांच्यासोबत संरक्षण विभागाचे पोलीस हवालदार चंद्रकांत माघाडे हेदेखील अंगरक्षक म्हणून काम करतात. शनिवारी १२ ऑक्टोंबरला बाबा सिद्धीकी हे वांद्रे येथील निर्मलनगर, खेरनगर, प्रियाससेस क्रमांक चौदा, इमारत क्रमांक ३५ येथील त्यांचा आमदार मुलगा झिशान सिद्धीकी याच्या कार्यालयातून घरी जाण्याासाठी निघाले होते. यावेळी तिथे आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या गोळीबारात बाबा सिद्धीकी यांच्या छातीत तीन गोळ्या लागल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे तिथे उपस्थित त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने वांद्रे येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर निर्मलनगर पोलिसांनी तिन्ही मारेकर्याविरुद् हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येची गृहविभागाने गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांना या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर या गुन्ह्यांचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. याच दरम्यान गोळीबारानंतर पळून जाणार्या दोन संशयित मारेकर्यांना पोलिसांनी अटक केली होती. चौकशीदरम्यान या दोघांची नावे गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप असल्याचे उघडकीस आले होते. गुरमेल हा मूळचा हरिणाणा तर धर्मराज हा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. त्यांच्या अटकेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली होती. गुरमेलच्या दोन्ही भावांचे मोबाईल बंद होते. त्यामुळे त्यांना एसएमएसद्वारे गुरमेलला अटक केल्याचा मॅसेज पाठविण्यात आला आहे. या दोघांनाही रविवारी दुपारी जी. टी हॉस्पिटलमध्ये मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी गुरमेल सिंगला कोर्टाने २१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. याच गुन्ह्यांत रविवारी रात्री प्रविण लोणकर याला पोलिसांनी अटक केली. प्रविण हा या कटाचा आरोपी शुभम लोणकर याचा भाऊ आहे. प्रविणला सोमवारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे.
धर्मराजच्या वयामुळे कोर्टात गोंधळाचे वातावरण
किल्ला कोर्टात हजर केलेल्या दुसरा आरोपी धर्मराजच्या वकिलांनी त्याचे वय एकोणीस नसून सतरा आहे. तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यामुळे कोर्टाने तपास अधिकार्यांना धर्मराजचे आधारकार्ड सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याच्या आधारकार्डची एक प्रत न्यायालयात सादर करण्यात आली होती. या आधारकार्डमध्ये फोटो धर्मराज कश्यप याचा होता, मात्र त्याचे नाव रंजनकुमार गुप्ता असे होते. त्यात १ मार्च २००३ अशी जन्मतारीख म्हणून नोंद होती. म्हणजेच त्याचे सध्याचे वय २१ आहे. धर्मराजच्या वयाबाबात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने न्यायालयाने त्याला मेडीकलसाठी पाठविले. त्यामुळे धर्मराजची जे. जे हॉस्पिटलमध्ये बॉर्न ओसीफिकेशन टेस्ट करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट नंतर पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यात धर्मराज हा अल्पवयीन नसल्यचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याला कोर्टाने २१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिवकुमार-जिशाल वॉण्टेड आरोपी
या गुन्ह्यांत शिवकुमार ऊर्फ शिवा गौतम आणि मोहम्मद जिशान अख्तर या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. ते दोघेही महाराष्ट्रातून इतर राज्यात पळून गेल्याची खात्रीलायक माहिती असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांकडून पोलिसांनी दोन पिस्तूलसह मॅगझीन, २८ जिवंत काडतुसे, चार मोबाईल, दोन आधारकार्ड पोलिसांनी जप्त केले आहे. दोन्ही मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे. या मोबाईलवरुन ते दोघेही कोणाच्या संपर्कात होते. या मोबाईलवरुन अनेक गोष्टींचा खुलासा होणार आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक व्यक्तीची पोलिसाकडून चौकशी होणार आहे. या हत्येची त्यांना माहिती होती का याचाही तपास सुरु आहे.