बाबा सिद्धीकी हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक व कोठडी
हत्येचे धागेदोरे कर्जत, डोबिवली, अंबरनाथपर्यंत; आरोपींची संख्या नऊवर
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते झियाउद्दीन अब्दुल रहिम सिद्धीकी ऊर्फ बाबा सिद्धीकी यांच्या हत्येतील वॉण्टेड आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली असताना या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या इतर पाच आरोपींना कर्जत, डोंबिवली आणि अंबरनाथ येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली होती. नितीन गौतम सप्रे, संभाजी किशन पारबी, राम फुलचंद कनोजिया, प्रदीप तोंबर आणि चेतन दिलीप पारधी अशी अटक केलेल्या आरोपीची नावे असून यातील नितीन सप्रे आणि राम कनोजिया यांनी या हत्येत महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या पाचही आरोपींना शुक्रवार २५ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे तर इतर वॉण्टेड आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची शोधमोहीम सुरु आहे.
बाबा सिद्धीकी हे राष्ट्रवादीचे नेते असून माजी आमदार आहेत. गेल्या शनिवारी त्यांची त्यांच्या आमदार पूत्राच्या वांद्रे येथील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गोळीबार करुन पळून जाणार्या दोन मारेकरी गुरमेल बलजीत सिंग आणि धर्मराज राधे कश्यप या दोन शूटरला पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीतून प्रविण रामेश्वर लोणकर याला पुण्यातून तर हरिशकुमार बालकराम निशाद याला उत्तरप्रदेशातून पोलिसांनी अटक केली होती. चारही आरोपी सध्या २१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले होते. आरोपींच्या चौकशीतून आलेल्या माहितीनंतर इतर आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेचे तीन ते चार पथक डोंबिवली, कर्जत आणि अंबरनाथ येथे पाठविण्यात आले होते. ही शोधमोहीम सुरु असतानाच नितीन सप्रे, संभाजी पारबी, राम कनोजिया, प्रदीप तोंबर आणि चेतन पारधी या पाचजणांना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या पाचही आरोपींना अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. या पाचमध्ये नितीन आणि राम कनोजिया हे मुख्य आरोपी असून इतर तिघांनी त्यांना कटात मदत केली होती. अटकेनंतर या सर्वांना किल्ला न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या चौकशीत धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम हे दोघेही ऑगस्ट महिन्यांत कर्जत येथे आले होते. त्यांची राहण्याची व्यवस्था नितीन आणि राम यांनीच केली होती. सप्टेंबर महिन्यांत त्यांना या दोघांनी घातक शस्त्रे पुरविले होते. याच दरम्यान त्यांना आर्थिक मदत केली होती. मात्र नितीनला मारेकर्यांना पैसे देण्यासाठी कोणी दिले होते हा तपासाचा भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नितीन हा वॉण्टेड आरोपी शुभम लोणकर आणि मोहम्मद जिशान अख्तर यांच्या संपर्कात होता. विदेशी हत्यार मिळाल्यानंतर शूटरने अंबरनाथ येथे गोळीबार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे बोलले जाते. विदेशी पिस्तूल हाताळण्याचे प्रशिक्षण घेतल्याशिवाय ते चालविता येत नसल्याने त्यांना प्रशिक्षणासाठी अंबरनाथ येथे खास वेळ देण्यात आला होता. नितीन आणि राम हे दोघेही थेट बिष्णोईच्या संपर्कात असल्याचेही तपासात उघडकीस आले आहे. नितीन, जिशान आणि शुभम एकमेकांच्या संपर्कात कधी आले, बिष्णोईकडून त्यांना काय आदेश मिळाले होते. त्यांच्यात कोणी मध्यस्थीची भूमिका पार पाडली होती याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे. नितीन आणि रामच्या आदेशावरुन प्रदीप कनोजिया, चेतन पारधी आणि संभाजी पारबी काम करत होते. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कम देण्यात येत होते. नितीन हा डोबिवली, चेतन, संभाजी आणि प्रदीप अंबरनाथ तर राम पनवेलचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सागितले. नितीन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्न, घातक शस्त्रे बाळगणे, धमकी देणे अशा तीन ते चार गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस कोठडीत असलेल्या नितीनसह इतर आरोपींच्या जबानीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
या पाच आरोपींच्या अटकेने बाबा सिद्धीकी यांच्या हत्येत आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले तर मुख्य शूटर शिवकुमार गौतम, शुभम लोणकर, मोहम्मद जिशान अख्तर या तिघांसह इतर आरोपींना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. संबंधित आरोपी विदेशात पळून जाऊ नये म्हणून त्यांच्याविरुद्ध याआधीच एलओसी जारी करण्यात आले आहे.