मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 मार्च 2025
मुंबई, – मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असताना तिचे एका 23 वर्षांच्या तरुणासोबत बालविवाह करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. विवाहानंतर आरोपी पतीकडून अल्पवयीन पत्नीवर लैगिंक अत्याचार झाल्याने ती गरोदर राहिली. हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या सतरा वर्षांच्या मुलीकडून हा प्रकार उघडकीस येताच बीकेसी पोलिसांनी आरोपी पतीसह त्याचा भाऊ आणि पिडीत मुलीची आई अशा तिघांविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो आणि बालविवाह कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे तर पतीचा भाऊ आणि मुलीच्या आईचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
23 वर्षांचा आरोपी हा सांताक्रुज येथील कालिना परिसरात राहतो. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत त्याचे पिडीत मुलीशी बालविवाह झाला होता. ही मुलगी सतरा वर्षांची असल्याचे माहित असताना त्याच्यासह त्याचा भाऊ आणि पिडीत मुलीच्या आईने या दोघांचे लग्न लावून दिले होते. त्यानंतर ती तिच्या पतीसोबत सांताक्रुज येथील सासरी आली होती. तिथेच आरोपी पतीने अल्पवयीन पत्नीवर जुलै 2024 ते मार्च 2025 या कालावधीत अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. अलीकडेच तिला सांताक्रुज येथील व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे मेडीकल केल्यानंतर ती गरोदर असल्याचे उघडकीस आले. ही मुलगी अल्पवयीन असल्याने तिची डॉक्टरांकडून चौकशी करण्यात आली हाती.
या चौकशीतून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून ही माहिती बीकेसी पोलिसांना देण्यात आली होती. याप्रकरणी एका महिला पोलीस शिपायाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता, बालविवाह आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत पतीच्या भावाला आणि पिडीत मुलीच्या आईला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिडीत मुलगी गरोदर असल्याने तिच्यावर व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.