पंधरा वर्षांच्या मुलीशी बालविवाह करुन शारीरिक शोषण
एकाच कुटुंबातील सातजणांविरुद्ध गुन्हा तर पतीला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – पंधरा वर्षांची अल्पवयीन मुलीशी बालविवाह करुन तिच्यासोबत सात वर्षांपासून शारीरिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील सातजणांविरुद्ध पंतनगर पोलिसांनी भादवीसह पोक्सो आणि बालविवाह कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत पिडीत तरुणीच्या पतीला पोलिसांनी अटक केली तर इतर सहाजणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. या सहाजणांवर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे. अटकेनंतर आरोपी पतीला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
२२ वर्षांची तक्रारदार तरुणी ही घाटकोपर परिसरात राहते. पंधरा वर्षांची असताना तिला आरोपीने प्रपोज केले होते. तिच्याशी संबंध ठेवून त्याने तिच्या कुटुंबियांच्या संमतीने तिच्याशी नवी मुंबईतील बुद्धविहारात बालविवाह केला होता. ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिच्या पतीने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. तिला मुलगी झाली, मात्र या मुलीचे नंतर निधन झाले होते. या घटनेला तीच जबाबदार असल्याचा आरोप करुन तसेच मुलगाच हवा अशी मागणी करुन कुटुंबातील इतर सदस्यांनी तिचा मानसिक व शारीरिक शोषण केला. तसेच तिच्या पतीने तिच्या चरित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक अत्याचार केला होता. सततच्या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून तिने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्याकडून तिचा मानसिक व शारीरिक शोषण सुरुच होता. त्यामुळे तिने पंतनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या पतीसह कुटुंबातील इतर सहाजणांविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर या सातही आरोपीविरुद्ध पोलिसांनी ३७६, ३७६ (२), (आय), (एन), (जे), ३२३, ५०४, ५०६, ४९८ (अ), ३४ भादवी सहकलम ४, ६, ८ पोक्सो सहकलम ९, १०, ११ बालविवाह कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत शनिवारी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर सहाजणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून या सहाजणांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.