मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 मार्च 2025
मुंबई, – भरवेगात कार चालविण्याच्या प्रयत्नात कार आणि बाईकची समोरासमोर धडक लागून झालेल्या अपघातात एका 45 वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू झाला. या बाईकस्वाराची ओळख पटली नसून त्याची ओळख पटावी यासाठी वांद्रे पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. अपघाताची नोंद करुन पोलिसांनी पुण्याचा रहिवाशी जोरावरसिंग दविंदर सचदेव या 40 वर्षांच्या हॉटेल चालकाला अटक केली. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
हा अपघात रविवारी रात्री साडेअकरा वाजता वांद्रे येथील माऊंट मेरी रोड, सेंट स्टिफन चर्चजवळ झाला होता. सोमनाथ चांगदेव पवार हे बदलापूर येथे राहत असून सध्या वांद्रे पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. रविवारी रात्री ते त्यांच्या सहकार्यासोबत परिसरात गस्त घालत होते. रात्री साडेअकरा वाजता गस्त घालताना संबंधित पोलीस पथकाला पश्चिम नियंत्रण कक्षातून एक संदेश प्राप्त झाला होता. त्यात वांद्रे येथील माऊंट मेरी रोड, सेंट स्टिफन चर्चजवळ अपघात झाल्याची माहिती सांगण्यात आली होती. त्यामुळे ते त्यांच्या सहकार्यासोबत तिथे गेले होते. घटनास्थळी गेल्यानंतर त्यांना एका कार आणि बाईकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याचे दिसून आले.
या अपघातात बाईकस्वार गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत बाईकस्वाराचे वय अंदाजे 45 असून त्याची ओळख पटेल अशी कुठलीही वस्तू त्याच्याकडे सापडली नव्हती. भरवेगात कार चालविण्याच्या प्रयत्नात कारचालकाने मृत बाईकस्वाराला धडक दिली होती. त्यात कारच्या चाकाखाली आल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. बाईकच्या क्रमांकावर त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. अपघातप्रकरणी कारचालक जोरावरसिंग याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. जोरावर सचदेव हा हॉटेल चालक असून पुण्याच्या पिसोळी, एनआयबीएम रोड, मँगो वूड्स परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.