मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ जुलै २०२४
मुंबई, – मनाविरुद्ध घटस्फोट दिला म्हणून पत्नीवर पतीनेच ऍसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना वांद्रे परिसरात घडली. या हल्ल्यात पत्नीसह बारा वर्षांचा मुलगा भाजला असून त्यांच्याावर कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या इशरत शेख या ४० वर्षांच्या आरोपीस निर्मलनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी घडलेल्या या ऍसिड हल्ल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजता वांद्रे येथील बेहरामपाडा, बकुळ निवास पोलीस चौकीजवळील नूरजहॉं गेटसमोर घडली. या परिसरात २४ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या बारा वर्षांच्या मुलासोबत राहते. इशरत हा तिचा पती असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होते. या वादाला कंटाळून तिने त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली होती. मात्र इशरतला तिला घटस्फोटा द्यायचा नव्हता. मात्र ती आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे त्यांच्यात घटस्फोट झाला होता. मनाविरुद्ध घटस्फोट झाल्याने इशरतला पत्नीविषयी प्रचंड राग होता. सोमवारी सायंकाळी तो घरी आला. यावेळी त्याची पत्नी दरवाज्यावर बसली होती. घटस्फोटावरुन त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने त्याच्याकडील ऍसिडने तिच्यावर हल्ला केला. त्यात तिच्यासह तिचा बारा वर्षांचा मुलगा भाजला होता. या घटनेनंतर इशरत हा पळून गेला होता. हा प्रकार समजताच स्थानिक रहिवाशांनी या दोघांनाही तातडीने कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ऍसिड हल्ल्यात या महिलेच्या पाठीवर, पोटावर आणि हाताला तर तिच्या मुलाला पाठीला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही माहिती मिळताच निर्मलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी जखमी झालेल्या महिलेची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पती इशरत शेख याच्याविरुद्ध १२४ (१) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पळून गेलेल्या इशरतला काही तासांत वांद्रे येथून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने ते ऍसिड कोठून आणले, त्याला ते ऍसिड कोणी दिले होते का याचा पोलीस तपास करत आहेत.