मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 जुलै 2025
मुंबई, – सुमारे 76 लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जसहीत एका आरोपीस वांद्रे युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्यांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 307 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई केल्यानंतर आरोपीला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
नागपाडा परिसरात काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वांद्रे युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने नागपाड्यातील एम. एस अली रोड परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. गुरुवारी तिथे आलेल्या 31 वर्षांच्या एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 307 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत 76 लाख रुपये आहे. चौकशीदरम्यान त्याने तो एमडी ड्रग्ज तिथे विक्रीसाठी घेऊन आल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.