बिहारहून आणलेल्या घातक शस्त्रांसह तरुणाला अटक
दोन पिस्तूल, मॅगझीन व जिवंत काडतुसे हस्तगत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 मार्च 2026
मुंबई, – बिहारहून आणलेल्या घातक शस्त्रांसह एका 23 वर्षांच्या तरुणाला गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटच्या अधिकार्यांनी अटक केली. मिथुन किराणी पौद्दार असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवाशी आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि चार जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. त्याच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्यांची मुंबई शहरात विक्री केली जात असल्याने अशा आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना वांद्रे परिसरात काहीजण घातक शस्त्रे घेऊनयेणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने सोमवारी वांद्रे येथील के सी मार्ग, वांद्रे रेक्लेमेशन ब्रिजखाली साध्या वेशात पाळत ठेवली होती.
सकाळी साडेदहा वाजता तिथे एक तरुण आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना दोन देशी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅगझीन आणि चार जिवंक काडतुसे सापडले. चौकशीत त्याचे नाव मिथुन पौद्दार असल्याचे उघडकीस आले. तो बिहारच्या लखीसराय, विसापूरच्या कृष्णानगरचा रहिवाशी आहे. चौकशीत तो वांद्रे परिसरात घातक शस्त्रांची विक्रीसाठी आला होता, मात्र शस्त्रांची विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
त्याच्याविरुद्ध पोलिसांनी घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मिथुनची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्याने यापूर्वीही घातक शस्त्रांची विक्री केली आहे. या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.