फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस दोन वर्षांनी अटक

बोगस धनादेश देऊन १८ लाखांचे हिरेजडीत दागिने घेऊन पलायन

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस दोन वर्षांनी अटक करण्यात वांद्रे पोलिसांना यश आले आहे. आदिल आरिफ सिद्धीकी असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत रिज्जू या त्याच्या सहकार्‍याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी सुमारे १८ लाख रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने क्रेडिटवर घेऊन बोगस धनादेश देऊन पलायन केले होते. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते, अखेर दोन वर्षांनी त्यापैकी मुख्य आरोपी आदिल सिद्धीकीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

रवी दुर्गादास अगनानी हे शीव-कोळीवाडा परिसरात राहत असून वांद्रे येथील महेश नोथनदास ज्वेलर्समध्ये सेल्स मॅनेजर म्हणून कामाला आहेत. २२ ऑगस्टला सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या दुकानात आदिल आणि रिज्जू नावाचे दोन तरुण आले होते. या दोघांनी दुकानाचे मालक महेशभाई यांना भेटायचे आहे असे सांगितले. त्यामुळे रवी अगनानी यांनी महेशभाई यांना कॉल केला होता. यावेळी आदिलने तो त्यांचा खार येथील परिचित जावेद जफार यांची ओळख सांगून त्यांच्याकडे दोन दिवसांच्या क्रेडिट सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहे. महेशभाई हे जावेद जफार यांना ओळखत होते, त्यामुळे त्यांनी रवी अगनानीला त्यांना सोन्याचे दागिने क्रेडिटवर देण्यास सांगितले. काही दागिन्यांची पाहणी केल्यानंतर या दोघांनी १८ लाख ३० हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने पसंद केले होते. ते दागिने घेतल्यानंतर त्यांनी त्यांना मॉडर्न डेकोरेटर्स नावाच्या कंपनीचा एक धनादेश, जीएसटी नोंदणी फॉर्म, आधारकार्ड दिला होता. त्यानंतर ते दोघेही दागिने घेऊन निघून गेले होते. दोन दिवसांनी त्यांनी आदिलला संपर्क साधला, मात्र पंधरा ते सोळा वेळा संपर्क साधूनही त्याच्याशी त्यांचा संपर्क झाला नाही.

२२ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत केलेल्या एक-दोन कॉलला प्रतिसाद दिल्यानंतर त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. तो विविध कारण सांगून दुकानात येतो, पेमेंट करतो असे सांगून कॉल कट करत होता. हा प्रकार नंतर त्यांनी महेशभाई यांना सांगितला. या दोघांनी १८ लाख ३० हजार रुपयांचे हिरेजडीत दागिने घेऊन बोगस धनादेश देऊन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वांद्रे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आदिल आणि रिज्जू या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. गेल्या दोन वर्षांपासून ते दोघेही पोलिसांना सतत गुंगारा देत होते.

अखेर पळून गेलेल्या आदिल सिद्धीकीला वांद्रे पोलिसांच्या एका विशेष पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच रिज्जूच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत रिज्जूला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांकडून लवकरच फसवणुकीचे हिरेजडीत दागिने हस्तगत केले जातील असे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page