व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने जोडप्याची फसवणुक
५३ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ डिसेंबर २०२४
मुंबई, – व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने एका जोडप्याची सुमारे ५३ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फहीद एम. कादरी या व्यावसायिक मित्राविरुद्ध वांद्रे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत तपास सुरु असून अद्याप आरोपीविरुद्ध अटकेची कारवाई झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
तन्वीर इब्राहिम हुसैन हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वांद्रे परिसरात राहतात. फहीद हा त्यांचा मित्र असून त्याचा स्वतचा जुन्या कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायात चांगला फायदा आहेत. त्याने त्यांच्यासोबत व्यवसायात गुंतवणुक करावी. या गुंतवणुकीवर त्याला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. फहीद हा त्याचा परिचित आणि चांगला मित्र होता. त्यामुळे त्याने त्याच्या व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत त्याच्या पत्नीने फहीदच्या व्यवसायात ७२ लाखांची गुंतवणुक केली होती. त्यापैकी ३९ लाख रुपये फहीदने तिला परत केले होते. याच कालावधीत तन्वीर हुसैन यांनीही त्याला २० लाख ५० हजार रुपये कॅश स्वरुपात दिले होते. जुलै २०२३ रोजी या पेमेंटनंतर फहीदन त्याला ४० लाखांचा धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. त्यामुळे त्यांनी फहीदकडे व्यवसायासाठी दिलेल्या उर्वरित ५३ लाख ५० हजाराची मागणी सुरु केली होती. मात्र तो पैसे देतो असे सांगूनही पैसे देत नव्हता. एक वर्ष उलटूनही त्याने त्यांचे पेमेंट केले नव्हते.
फहीदकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वांद्रे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांतर फहीदविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. फहीदने व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.