मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 फेब्रुवारी 2025
मुंबई, – एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटच्या अधिकार्यांनी अटक केली. जहाँगीर शहाआलम शेख आणि सैनोल शेख अशी या दोघांची नावे असून या दोघांकडून पोलिसांनी 5 किलो 40 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. या एमडी ड्रग्जची किंमत दहा कोटी आठ लाख रुपये इतकी आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
दादर येथील स्वामी नारायण मंदिरजवळ उल्हाळी जमिन अतिथीगृह नावाचे एक गेस्ट आहेत. याच गेस्ट हाऊसमध्ये काही संशयित आरोपी थांबले असून त्यांच्या मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी दया नायक व त्यांच्या पथकाने तिथे बुधवारी रात्री साडेदहा वाजता छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान एक व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाला तर रुममधून दोन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची नावे जहाँगीर शेख आणि सैनोल शेख असल्याचे उघडकीस आले. त्यांच्यासह रुमची तपासणी केल्यानंतर या अधिकार्यांना 5 किलो 40 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत दहा कोटी आठ लाख रुपये इतकी आहेत.
यातील जहाँगीर शेख हा हिरानंदानी, आकृती इमारतीमध्ये तर सैनोल शेख हा कोलकाताच्या मालदाह, चारबाबूपूरचा रहिवाशी आहे. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून दोघांविरुद्ध यापूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी जहाँगीरला जुलै 2017 रोजी ड्रग्जच्या गुन्ह्यांत वरळी युनिटच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटकेची कारवाई केली होती. चार वर्षांनी त्याला विशेष सेशन कोर्टाने जामिनावर सोडून दिले होते. त्यानंतर तो पुन्हा ड्रग्ज तस्करीमध्ये सक्रिय झाला होता. 2018 साली सैनोल शेख याला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी बोगस नोटांचा साठा जप्त केला होता. याच गुन्ह्यांत त्याला नंतर जामिन मंजूर झाला होता असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.