केळी विक्रीच्या नावाखाली ड्रग्जची विक्रीप्रकरणी वयोवृद्धाला अटक
35 लाखांचे 153 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 ऑगस्ट 2025
मुंबई, – हातगाडीवर केळी विक्रीच्या नावाखाली एमडी ड्रग्जची विक्री करणार्या एका 60 वर्षांच्या वयोवृद्धाला वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. मोहम्मदअली अब्दुल गफार शेख असे या वयोवृद्धाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 35 लाख रुपयांचे 153 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोहम्मदअली हा वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ हातगाडीवर केळी विक्रीचा व्यवसाय करत होता. केळी विक्रीच्या नावाखाली तो एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर शुक्रवारी रात्री उशिरा प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्कर्ष वझे, जयदीप जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल म्हाळसंक, पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके, पोलीस शिपाई राकेश कदम यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.
रात्री उशिरा मोहम्मद अली वांद्रे बसडेपोजवळील महाराष्ट्रनगर रस्त्यावरुन जात होता. यावेळी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या हातगाडीची पाहणी केल्यानंतर त्यात पोलिसांना एक स्टिलची पेटी सापडली. त्यातील पिशवीतून पोलिसांनी 153 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात ड्रग्जची किंमत 35 लाख 30 हजार रुपये इतकी आहे.
तपासात मोहम्मदअली शेख हा वांद्रे येथील एमएटी कॉलेजजवळील बीआरडी चाळीत राहत होता. काहीच कामधंदा नसल्याने तो केळी विक्रीचे काम करत होता. मात्र त्यातून कमी पैसे मिळत असल्याने त्याने केळी विक्रीच्या आड एमडी ड्रग्जची विक्री सुरु केली होती. मात्र या ड्रग्ज विक्रीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला ते एमडी ड्रग्ज कोण देत होता, त्याची तो कधीपासून विक्री करत होता. या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.