मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मार्च 2025
मुंबई, – राज्याच्या उर्जा विभागात कामाला असलेल्या एका शासकीय अधिकार्याच्या घरी सात लाखांची चोरी केल्याप्रकरणी अश्मित रितेश चरोटे या 20 वर्षांच्या नोकराला वांद्रे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु असून या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. अश्मित चरोटे हा मुंबई शहरात एक यशस्वी अभिनेता बनण्यासाठी आला होता, मात्र चोरीमुळे त्याला जेलची हवा खावी लागणार आहे.
गौरव राजेंद्र पुखाल हे वांद्रे येथील लिलावती हॉस्पिटलजवळील शासकीय वसाहतीत राहतात. सध्या ते महाराष्ट्र राज्याच्या उर्जा विभागात एसआरसीआरडीसी या पदावर काम करतात. गौरव हे मूळचे नागपूरचे रहिवाशी असून त्यांचा मित्र विनय खोरगडे यांनी त्यांची अश्मितची ओळख करुन दिली होती. त्याची आई त्याला सोडून गेली असून त्याच्या वडिलांना दारु पिण्याचे व्यसन होते. त्याला भविष्यात एक यशस्वी अभिनेता बनायचे होते, त्यासाठी त्याला मुंबईत काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे गौरव हे त्याला घेऊन फेब्रुवारी महिन्यांत मुंबईत घेऊन आले होते. त्यांच्या मामाचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे तो त्यांना मदतनीस म्हणून काम करत होता. काम करुन तो गेस्ट हाऊसमध्ये राहत होता. मात्र तिथे त्याच्याविषयी तक्रार आल्यानंतर त्यांनी त्याला भावाकडे पाठविले होते. त्यानंतर तो घरातील लहानसहान काम करत होता.
6 मार्चला त्यांनी गोल्ड लोन भरण्यासाठी कपाटात पाच लाखांची कॅश ठेवली होती. 14 मार्चला त्यांना नागपूरला जायचे होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात कपाटाची चावी नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीकडे विचारणा केली होती, मात्र तिला चावीबाबत काहीच माहिती नव्हती. दुसर्या दिवशी त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कपाटातील सुमारे सात लाखांची कॅश चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी अस्मितकडे विचारणा केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले. मात्र नंतर त्याने कपाटातून सात लाखांची कॅश चोरी करुन अंधेरीतील मित्राकडे ठेवल्याची कबुली दिली. त्याच्याकडे पैशांची मागणी केल्यानंतर त्याने पैसे देण्यास नकार दिला.
पावणेसात लाखांच्या चोरीप्रकरणी चार महिलांविरुद्ध गुन्हा
अन्य गुन्ह्यांत चार महिला नोकराविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात लताबाई, विजया, मकसुदा आणि हेमलता शिवाजी यमलवाड यांचा समावेश आहे. सुधीर भीमराव माने हे वयोवृद्ध गोरेगाव येथे राहतात. त्यांच्याकडे चार महिला कामाला असून लताबाई ही पंधरा वर्षांपासून, विजया दिड वर्षापासून, मकसूदा एक महिन्यांपासून तर हेमलता ही दिड महिन्यांपासून काम करते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरातून सोन्याचे, हिर्याचे दागिने चोरीस जात होते. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले, नंतर त्यांनी कपाटाची पाहणी केली असता 7 फेब्रुवारी ते 13 मार्च 2025 या कालावधीत त्यांना त्यांच्या कपाटातून विविध सोन्याचे, हिर्याचे दागिने, विदेशी चलन असा सुमारे पावणेसात लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी गोरेगाव पोलिसांत चोरीची तक्रार केली होती. त्यांच्या घरी या चार महिला वगळता कोणीही येत नव्हते. त्यामुळे त्यांनी चारपैकी कोणीतरी कपाटातील दागिने आणि विदेशी चलन चोरी केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.