मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 मार्च 2025
मुंबई, – वांद्रे येथील नामांकित खिशाला शोरुममध्ये सोमवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने शोरुमच्या खिडकीतून आत प्रवेश करुन तिजोरीची लॉक तोडून सव्वीसपैकी पाच बॉक्समधील एक कोटी नव्वद लाखांचे महागडे हिरेजडीत सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केले. याप्रकणी वांद्रे पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेकडून संमातर तपास सुरु आहे. याकामी तीन ते चार पथकाची नियुक्ती करण्यात आली असून सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना शनिवारी रात्री सव्वाआठ ते सोमवारी सकाळी सव्वादहा वाजता वांद्रे येथील गुरुनानक रोड, टर्नर हाऊसच्या खिशाला बँ्रण्डच्या अॅडमिनिस्टेशन कार्यालयात घडली. समर्थ सुरेश बजाज हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत खार येथील चौदावा रोड, अहिंसा मार्ग, सतरा रेसीडेन्सीमध्ये राहतात. त्यांचा वांद्रे येथे खिशाला नावाचे एक शोरुम तसेच कार्यालय आहे. त्यांचा ज्वेलरीचा व्यवसाय असून या शोरुममध्ये महागड्या हिरेजडीत तसेच सोन्याच्या दागिन्यांची विक्री होते. शनिवारी रात्री सव्वाआठ वाजता त्यांचा कर्मचारी अनिलने सर्व व्यवहार बंद झाल्यानंतर शोरुम बंद केले होते.
रविवारी सुट्टी असल्याने शोरुम बंद होते. त्यामुळे सोमवारी सकाळी सव्वादहा वाजता शोरुम उघडण्यात आले होते. यावेळी एका कर्मचार्याने नेहमीप्रमाणे लॉकर चावीने उघडून आतील ज्वेलरीचे बॉक्स बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याला 26 पेकी पाच बॉक्समधील सर्व ज्वेलरी गायब असल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने समर्थ बजाज यांना कॉलवरुन ही माहिती दिली होती. त्यामुळे ते शोरुममध्ये आले होते. पाच बॉक्सची तपासणी केल्यानंतर आतील सुमारे एक कोटी नव्वद लाख रुपयांचे हिरेजडीत आणि सोन्याचे महागडे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले होते. त्यानंतर त्यांनी ही माहिती वांद्रे पोलिसांसह विमा कंपनीला दिली होती. ही माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
संपूर्ण तिजोरीची पाहणी केल्यानंतर 2786 ग्रॅम वजनाचे सोने आणि हिर्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. या दागिन्यांची किंमत एक कोटी नव्वद लाख रुपये इतकी होती. प्राथमिक तपासात शोरुमच्या खिडकीतून अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला होता. प्रवेश केल्यानंतर त्याने सर्व सीसीटिव्ही फुटेज बंद केले होते. त्यानंतर त्याने तिजोरीचा लॉक तोडून आतील पाच बॉक्समधील दागिने चोरी करुन पलायन केले होते. या घटनेनंतर समर्थ बजाज यांच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
या चोरीच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या गुन्ह्यांचा वांद्रे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.