क्रिशाला ब्रॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रिशनमधील घरफोडीचा पर्दाफाश

चोरीचे संपूर्ण 1.91 कोटीचे हिरेजडीत सोन्याचे दागिने जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 मार्च 2025
मुंबई, – वांद्रे येथील नामांकित क्रिशाला ब्रॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रिशन कार्यालयात झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात वांद्रे पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचे संपूर्ण 1810 ग्रॅम वजनाचे सोने व हिरेजडीत दागिने असा 1 कोटी 91 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आर्या प्रताप नाग ऊर्फ दिपक ध्रुव आणि रविंद्रकुमार गुप्ता ऊर्फ सलमान शेख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही उत्तरप्रदेश व छत्तीसगढचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना शनिवारी 8 मार्चला रात्री सव्वाआठ ते सोमवार 10 मार्च सकाळी सव्वादहा वाजता वांद्रे येथील गुरुनानक रोड, टर्नर हाऊसच्या क्रिशाला बँ्रण्डच्या अ‍ॅडमिनिस्ट्रिशन कार्यालयात घडली. समर्थ सुरेश बजाज हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत खार येथील चौदावा रोड, अहिंसा मार्ग, सतरा रेसीडेन्सीमध्ये राहतात. त्यांचा वांद्रे येथे क्रिशाला नावाचे एक शोरुम तसेच कार्यालय आहे. त्यांचा ज्वेलरीचा व्यवसाय असून या शोरुममध्ये महागड्या हिरेजडीत तसेच सोन्याच्या दागिन्यांची विक्री होते. शनिवारी 8 मार्चला रात्री सव्वाआठ वाजता त्यांचा कर्मचारी अनिलने सर्व व्यवहार बंद झाल्यानंतर शोरुम बंद केले होते. रविवारी सुट्टी असल्याने शोरुम बंद होते. त्यामुळे सोमवारी 10 मार्चला सकाळी सव्वादहा वाजता शोरुम उघडण्यात आले होते. यावेळी एका कर्मचार्‍याने नेहमीप्रमाणे लॉकर चावीने उघडून आतील ज्वेलरीचे बॉक्स बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याला 26 पेकी पाच बॉक्समधील ज्वेलरी गायब असल्याचे दिसून आले.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने समर्थ बजाज यांना कॉलवरुन ही माहिती दिली होती. त्यामुळे ते शोरुममध्ये आले होते. पाच बॉक्सची तपासणी केल्यानंतर आतील 1 कोटी 91 लाखांचे हिरेजडीत सोन्याचे महागडे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले होते. त्यानंतर त्यांनी ही माहिती वांद्रे पोलिसांसह विमा कंपनीला दिली होती. ही माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. संपूर्ण तिजोरीची पाहणी केल्यानंतर 1810 ग्रॅम वजनाचे सोने आणि हिर्‍याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. प्राथमिक तपासात शोरुमच्या खिडकीतून अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला होता. प्रवेश केल्यानंतर त्याने सर्व सीसीटिव्ही फुटेज बंद केले होते. त्यानंतर त्याने तिजोरीचा लॉक तोडून आतील पाच बॉक्समधील दागिने चोरी करुन पलायन केले होते.

या घटनेनंतर समर्थ बजाज यांच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकराव पोळ यांनी गंभीर दखल घेत वांद्रे पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे, पोलीस निरीक्षक अजय लिंगणुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग जगताप, विजय आचरेकर, तुषार सावंत, रणजीत चव्हाण, अभिषेक पाटील, दत्तात्रय कोकणे, सुनित घाडगे, पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील, हनुमंत कुंभारे यांच्यासह वांद्रे, सांताक्रुज, खार, डी. एन नगर, आंबोली, जुहू पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेतील अंमलदारांनी तपास सुरु केला होता.

जवळपास सात विशेष पथकाने आरोपींच्या अटकेसाठी मुंबईसह मुंबईबाहेर शोध सुरु केला होता. सीसीटिव्ही आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आरोपींची माहिती काढून आर्या नाग आणि सलमान शेख या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान या दोघांनीच ही घरफोडी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. यातील आर्या हा छत्तीसगडच्या बस्तर तर रविंद्रकुमार हा उत्तरप्रदेशच्या बहराईख सरावस्तीचा रहिवाशी आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 1810 ग्रॅम वजनाचे सोने व हिर्‍याचे दागिने जप्त केले असून त्याची किंमत 1 कोटी 91 लाख रुपये इतकी आहे. अशा प्रकारे गुन्हा दाखल होताच अवघ्या दहा दिवसांत या गुन्ह्यांतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी चोरीच्या संपूर्ण मुद्देमालासह अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page