मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2025
मुंबई, – वांद्रे येथे राहणार्या एका वयोवृद्धाच्या घरी साडेसोळा लाखांची घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेामगे त्यांच्या घरातील चालक अभिषेक सिंग याचाच सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
प्रेमसिंग महेंद्र सिंग हा मूळचा पंजाबचा रहिवाशी असून सध्या वांद्रे येथील खेरवाडी, एमआयजी क्लब, झेंड गार्डन परिसरात राहतो. तो सध्या बीएससी नर्सिंगमध्ये शिक्षण घेत असून त्याला गायकवाड कुटुंबियांनी त्यांच्या देखभालीसाठी संपर्क साधला होता. त्यामुळे तो वयोवृद्ध असलेल्या किशन गायकवाड आणि पुष्पा गायकवाड यांच्या देखभालीचे काम करत असून त्यांच्याच घरी राहतो. या कामाचे त्याला मोबदला दिला जातो. त्यांच्याकडे इतर नोकरामध्ये अभिषेक सिंग हा चालक म्हणून काम करतो. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांत त्यांच्या घरातील बाल्कणीचा दरवाजा लॉक तोडून सोनी कंपनीचा स्पिअरसह एक महागडी सायकल चोरीस गेली होती. या चोरीमागे अभिषेकचा सहभाग असल्याचा त्याला संशय होता. मात्र त्याने पोलिसांत तक्रार केली नव्हती.
या चोरीनंतर त्याने अभिषेककडे विचारणा केली होती, मात्र त्याने उडवाउडवीचे उत्तरे देऊन त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. अनेकदा अभिषेक हा घरात येत होता आणि कोणालाही काहीही न सांगता लपूनछपून बाहेर जात होता. 7 फेब्रुवारीला किशन गायकवाड यांचे अरमानी जॅकेट चोरीस गेले होते. त्यामुळे त्याने या जॅकेटसह इतर काही वस्तू चोरीस गेली आहे का याची शहानिशा केली होती. त्यात त्याला घरातील विविध सोन्याचे दागिने, दोन लाखांची कॅश, रॅडो कंपनीचा महागडा घड्याळासह इतर वस्तू असा साडेसोळा लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर त्याने किशन गायकवाड यांना चोरीची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या सल्ल्यानंतर त्याने अभिषेकविरुद्ध खेरवाडी पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अभिषेक सिंग याच्याविरुद्ध पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने त्याची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. 20 ऑगस्ट 2024 ते 7 फेब्रुवारी 2025 या कालावधीत अभिषेकने किशन गायकवाड यांच्या घरातून साडेसोळा लाखांचे दागिने, कॅशसहीत इतर मुद्देमाल चोरी केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले.