मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 फेब्रुवारी 2025
मुंबई, – वाहतुक कर्तव्य बजाविणार्या एका महिला पोलीस अधिकार्यासह दोन पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणण्यात आल्याची घटना वांद्रे आणि मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वांद्रे आणि मालाड पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यात एका महिलेचा समावेश असून चौकशीनंतर या तिघांनाही 35 (3) अन्वये नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.
38 वर्षांच्या तक्रारदार महिला या सांताक्रुज येथील न्यू पोलीस वसाहतीत राहत असून सध्या वांद्रे वाहतूक पोलीस चौकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी 19 फेब्रुवारीला दुपारी दिड वाजता त्या त्यांच्या सहकार्यासोबत वांद्रे येथील एस. व्ही रोड, जरीमरी माता मंदिर सिग्नलजवळ कर्तव्य बजावत होते. यावेळी सुभान शेख हा विरुद्ध दिशेने बाईक घेऊन येत असल्याचे तिथे उपस्थित वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याला थांबविण्याचा इशारा करण्यात आला होता. यावेळी सुभानसह त्याच्यासोबत असलेल्या फरीदा शेख यांनी समीरा सय्यद यांच्याशी अश्लील भाषेत शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग केला. त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांच्यासह इतर पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर त्यांच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी विनयभंगासह पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर सुभान शेख आणि फरीदा शेख या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
दुसर्या घटनेत सागर केशवजी गाला या तरुण व्यावसायिकाविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सहाय्यक फौजदार संतोष श्रीधर भोगले हे गोरेगाव वाहतूक विभागत कार्यरत आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता ते मालाड येथील एस. व्ही रोड, अॅक्सिस बँकेच्या विरुद्ध बाजूला कर्तव्य बजावत होते. यावेळी सागरने तिथे त्याची बाईक पार्क केली होती. त्याच्या बाईक पार्किंगमुळे तिथे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे बाईकवर कारवाई करताना त्याने संतोष भोगले यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडून दिले होते.